
Rang Panchami 2023 : 2 लाख लिटर पाण्याचा शॉवर रंगोत्सवात वापर
जुने नाशिक : रंगपंचमीनिमित्त ठिकठिकाणी शॉवर रंगोत्सवाची मोठी धूम दिसून आली. यासाठी सुमारे दोन लाख लिटर पाणी खर्ची पडले. शहरात रंगपंचमीनिमित्त शॉवर रंगोत्सवाचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. (2 lakh liters of water used in shower of Rang Panchami nashik news)
जुने नाशिक भागात १२ शॉवर, इंदिरानगरमध्ये २, गंगापूर रोड २ यासह विविध भागातील असे सुमारे १५ ते १६ पेक्षाही अधिक ठिकाणी शॉवर रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रत्येक शॉवरला एक ते तीन पाण्याच्या टँकरच्या आवश्यकता भासली.
दहा हजार लिटरचा एक टँकर, असे सरासरी दोन लाख लिटर पाण्याचा वापर शॉवर रंगोत्सवात करण्यात आला. यासाठी टँकरमधून शॉवरपर्यंत तात्पुरती पाइपलाइन करण्यात आली होती. या पाईपलाईनच्या माध्यमातून टँकरमधील पाणी रंगप्रेमींवर वर्षाव करण्यात आले.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
चार ते पाच वर्षांपूर्वी शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळेस शहरातील रंगोत्सव रद्द करण्यात आले होते. तर यंदा मात्र टँकरच्या पाण्याच्या माध्यमातून जणू कृत्रिम पाऊसच पाडण्यात आल्याचे चित्र सर्वच शॉवरच्या ठिकाणी बघावयास मिळाले.
त्याचप्रमाणे रहाड आणि लहान मोठ्या स्वरूपात ठिकठिकाणी साजरी करण्यात आलेल्या रंगपंचमीसाठी वापरलेल्या पाण्याचा विचार केला तर सुमारे तीन ते साडेतीन लाख लिटर पाण्याचा वापर झाल्याचे आढळून आले. यात समाधानाची बाब म्हणजे खासगी टँकरच्या पाण्याचा वापर करण्यात आला.