
Nashik News: 2 वर्षांपूर्वी गहाळ सोन्याची चैन वॉशिंग मशिनमध्ये सापडली! सर्व्हिस इंजिनिअरचा प्रामाणिकपणा
Nashik News : नादुरुस्त झालेले वॉशिंग मशिन दुरुस्तीसाठी सर्व्हिस इंजिनिअर आला असता, मशिनच्या पाइपमध्ये सात तोळ्याची सोन्याची चैन त्यांच्या हाती लागली. परंतु, कोणताही मोह न बाळगता त्यांनी ती सोन्याची चैन प्रामाणिकपणे परत केली.
विशेषत: सदरची चैन दोन वर्षांपूर्वी गहाळ झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच त्यांनीही या सर्व्हिस इंजिनिअरचे कौतुक केले आहे. (2 years ago missing gold chain found in washing machine Honesty of Service Engineer Nashik News)
तुषार बाजीराव सूर्यवंशी (रा. मखमलाबाद, मुळ मुंगसे, ता. मालेगाव) असे या सर्व्हिस इंजिनिअरचे नाव आहे. तुषार हे नामांकित कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनिअर म्हणून नोकरी करतात. शहरातील शरणपूर रोड परिसरात राहणारे ॲड. वसंतराव तोरवणे यांच्या घरातील वॉशिंग मशिन नादुरुस्त झाले होते.
त्यासंदर्भात तुषार हे त्यांच्या घरी मशिन दुरुस्तीसाठी गेले. वॉशिंग मशिनची दुरुस्ती करीत असताना मशिनमधील एका पाइपमध्ये त्यांना काहीतरी अडकलेले दिसले. त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता ती सुमारे सात तोळ्याची सोन्याची चैन होती.
त्यांनी घरातील मोलकरणीकडे घरातील काही मौल्यवान वस्तू हरविल्याबाबत विचारणा केली असता तिने नकार दिला. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात ॲड. तोरवणे यांच्या कार्यालयात फोन करून विचारले असता, त्यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी सोन्याची चैन घरात गहाळ झाल्याचे सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तुषार यांनी त्यांना घरी बोलावून घेत त्यांच्या हाती मशिनमध्ये सापडलेली सोन्याची चैन दिली. ती चैन पाहून तोरवणे दांपत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ॲड. तोरवणे यांनी तुषार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
कंपनीकडूनही कौतुकाची थाप
तुषार सूर्यवंशी यांच्या प्रामाणिकपणाची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचली. त्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट तुषारशी संपर्क साधून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुकाची थाप दिली. तसेच, कंपनीच्या वतीने तुषार यांना सन्मानितही करण्यात आले.
"मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. सोन्याची चैन त्यांच्याही कष्टाच्या पैशांनीच घेतलेली असेल; या भावनेतून त्यांना तत्काळ चैन परत केली."
- तुषार सूर्यवंशी, सर्व्हिस इंजिनिअर, नाशिक.