Nashik News: RTEच्या 4854 जागांसाठी तब्बल 21 हजार 850 अर्ज; मार्चअखेर निघणार सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE School

Nashik News: RTEच्या 4854 जागांसाठी तब्बल 21 हजार 850 अर्ज; मार्चअखेर निघणार सोडत

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी (ता. २५) संपुष्टात आली. सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील चार हजार ८५४ जागांसाठी २१ हजार ८५० अर्ज प्राप्त झाले होते. रात्री बारापर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे.

अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ होईल. यंदा प्रवेशासाठी राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर होणार आहे. सोडतीनंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी एक नियमित फेरी राबविली जाईल. या फेरीमध्ये संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी टप्प्याटप्प्याने प्रतीक्षा यादीनुसार चार फेऱ्या राबविल्या जातील.

प्रवेश अर्ज करताना पालकांना दहा शाळांची निवड करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने या राखीव जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो.

गतवर्षी जानेवारीत शाळांची नोंदणी होऊन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश अर्जप्रक्रियेला सुरवात झाली होती. नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळांमध्ये यंदा २५ टक्के अंतर्गत राखीव असलेल्या चार हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठीची अर्जप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, राज्यभरातील एक लाख जागांसाठी तब्बल तीन लाख ५५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत, तर नाशिकमधील ४०१ शाळांत प्रवेशासाठी चार हजार ८५४ जागा उपलब्ध असून, त्यासाठी अंतिम दिवसापर्यंत २१ हजार ८५० अर्जांची नोंदणी झाली आहे.

प्राप्त जागा व अर्ज बघता एका जागेसाठी तीन ते चार विद्यार्थी स्पर्धेत असल्याने प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मार्चअखेर सोडत जाहीर होण्याची शक्यता असून, प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया एप्रिल व मेमध्ये होण्याची शक्यता आहे.

वंचित गटातील मुलांच्या प्रवेशाकरिता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. तर एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. प्रवेशाकरिता दहा शाळांची निवड करावी. अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर गुगल मॅपने निश्चित केले जाणार आहे.

अशी झाली नोंदणी

१) ‘आरटीई’साठी नोंदणी केलेल्या शाळांची संख्या- ४०१

२) प्रवेशासाठी उपलब्ध जागा- चार हजार ८५४

३) विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल संख्या- २१,८५०

टॅग्स :NashikeducationRTE