
NMC News : सव्वा किलोमीटरच्या मार्गात 250 अतिक्रमणे; अतिक्रमण कारवाई लूटूपूटू
Nashik News : महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सध्या शहरात अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतली जात असली तरी अतिक्रमण विभागाची कारवाई लूटूपूटूची ठरत आहे. (250 encroachments in half kilometer route nashik news)
सारडा सर्कल ते दामोदर टॉकीज या दरम्यान महापालिकेच्या जागेवर २५० पक्क्या स्वरूपाची अतिक्रमणे असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली असून ती अतिक्रमणे का हटविली जात नाही? या मागे राजकीय दबाव आहे का? धार्मिक जागांवर व्यावसायिक गाळे उभारता येतात का? या सारखे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
सारडा सर्कल ते दामोदर टॉकीज या दरम्यान महापालिकेच्या जागेत झालेली अतिक्रमणांची अभय सुरेश अवसरकर यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली. तातडीने माहिती मिळणे अपेक्षित असताना तब्बल दहा महिने माहिती देण्यासाठी लावण्यात आले.
अतिक्रमण विभागाकडून नगररचना व नगररचना विभागाकडून अतिक्रमण असे माहिती अर्जाची फेकाफेकी झाली. अखेर दफ्तर दिरंगाईचे अस्त्र उपसल्यानंतर ज्या जागेची माहिती विचारण्यात आली त्याचे पीटी शीट अवसरकर यांना सादर करण्यात आले. त्या पीटी शीट मध्ये महापालिकेने पंधरा मीटर रस्त्यावर अतिक्रमण झाल्याची कबुली दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वाहतुकीसाठी फक्त आठ मीटर रस्ता
सारडा सर्कल ते हाजी मिठाई तेथून पुढे दूध बाजार ते दामोदर टॉकीज या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंधरा मीटर असताना प्रत्यक्षात पायी चालण्यासाठी व वाहतुकीसाठी फक्त आठ ते नऊ मीटर रस्ता उपलब्ध आहे. उर्वरित रस्त्यावर अतिक्रमणे असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे.
वाकडी बारव ते सारडा सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने रस्ता रुंद दिसत असला तरी बाजूला असलेल्या कब्रस्तानच्या जागेवर व्यावसायिक गाळे उभारण्यात आले आहेत. असे गाळे उभारता येतात का? याचे उत्तर महापालिकेकडून संबंधितांना मिळालेले नाही.
महापालिकेने दिलेल्या माहिती मध्ये तीन माजी नगरसेवकांच्या मालकीच्या दुकानांचे अतिक्रमण असल्याची माहिती समोर आली आहे. भंगार शॉप, फेब्रिकेशन, गॅस वेल्डिंग, पान टपरी, गॅरेजेस, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटसच्या दुकानांचा समावेश आहे.
"महापालिकेकडून सध्या सुरु असलेल्या अतिक्रमण कारवाईला अर्थ नाही. हातगाडे, हॉकर्स वर कारवाई केली जात आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांवरील गाळे हटविल्यास अनेक प्रश्न सुटतील." - अभय अवसरकर, पदाधिकारी, शिवसेना (उबाठा).