Nashik Bribe Crime: भूमिअभिलेखचे आणखी 3 लाचखोर जाळ्यात; LCB चे छापे पडूनही लाचखोरी काही थांबेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

Nashik Bribe Crime: भूमिअभिलेखचे आणखी 3 लाचखोर जाळ्यात; LCB चे छापे पडूनही लाचखोरी काही थांबेना

नाशिक : जमिनी मोजणीच्या प्रकरणात सामान्य शेतकऱ्यांची किती लूट असावी, याचा प्रत्यय महिन्यापासून येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिन्याच्या आता अधीक्षकांसह तीन प्रकरणांत लाच घेताना पकडूनही भूमिअभिलेख विभागातील लाचखोरी काही थांबेना.

त्र्यंबकेश्वरला आणखी तिघांना लाच घेताना साफळा लावून पकडण्यात आले. (3 more Bhoomiabhilek employees nabs Even after LCB raids bribery did not stop Nashik Bribe Crime news)

नाशिकला भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले असतांना त्यानंतर पळसे (ता. नाशिक) येथेही दुसरा प्रकार उघडकीस आला. या दोन्ही प्रकारांची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी (ता.९) त्र्यंबकेश्वर येथे भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात आणखी तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

शिरस्तेदार दौलत समशेर, भूकरमापक भास्कर राऊत यांच्यासह वैजनाथ पिंपळे (रा. शांतिनगर, मखमलाबाद) या खासगी व्यक्तीला सहा लाखांची लाच घेताना पकडण्यात आले.

फायनल लेआउट मोजणी

तळेगाव येथील जागेच्या फायनल लेआउट मोजणी करण्यासाठी तक्रारदाराचे क्षेत्र सरकून देण्यापोटी भूमिअभिलेखच्या संशयितांना सहा लाखांची लाच हवी होती. मोजणीदरम्यान अर्जदाराचे क्षेत्र सरकू नये म्हणूनही भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची मिन्नतवारी करावी लागते हेही या प्रकरणातून पुढे आले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

क्षेत्र सरकून देण्याच्या मोबदल्यापोटी शिरस्तेदार दौलत समशेर आणि भूकरमापक भास्कर राऊत यांनी खासगी एजंटला मध्यस्थी टाकून त्यामार्फत दहा लाखांची लाच मागून अडवणूक करीत होते. मात्र त्यात सहा लाखांवर तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी सापळा लावला होता.

यात वैजनाथ पिंपळे खासगी व्यक्तीला मध्यस्थी प्रकरणात अटक केली आहे. या खासगी एजंटने कार्यालयातच तीन लाखांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत पुढे आल्याने तिघांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.