
Nashik Crime News : वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे ठार
नाशिक : शहरात वेगवेगळ्या परिसरात घडलेल्या अपघाती घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यात दोन घटनांमध्ये दुचाकीस्वाराचा तर एक घटनेत पादचारी युवकाचा समावेश आहे. पहिल्या घटनेत टेम्पोने धडक दिल्याने पादचारी युवक ठार झाल्याची घटना सातपूर येथील सीएट कंपनीसमोर घडली. (3 people have died in accidents that happened in different localities nashik crime news)
या अपघातात शुभम यशवंत बच्छाव (१९, रा. सातपूर) याचा मृत्यू झाला. शुभम हा शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी कामावरून घरी जात असताना भरधाव टेम्पोने (एमएच १५ जेसी ०५८७) शुभमला धडक दिली. त्यात शुभमचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात टेम्पोचालक रोहिदास रामदास वाघ (रा. श्रमिकनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत झाकिर हुसेन हॉस्पिटलसमोर उभ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाला. ऋषिकेश विजय दमक (२५, रा. बळी मंदिर, के. के. वाघ कॉलेजमागे), असे मयत युवकाचे नाव आहे. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
याप्रकरणी भद्रकाली पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर तिसऱ्या घटनेत नाशिक रोड परिसरातील चांदगिरी कॅनल रोडवर दोन दुचाकींच्या धडकेत एकजण ठाण झाल्याची घटना घडली. शेखर राजू पगारे (२७, रा. कोटमगाव) असे मयत युवकाचे नाव आहे.
शुक्रवारी (ता. १७) सकाळी पगारे दुचाकीवरून चांदगिरी कॅनॉलने जात असताना अज्ञात दुचाकीने समोरून धडक दिली. यात गंभीर जखमी पगारे यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात मृत्यूची नोंद केली आहे.