
NMC Water Scarcity Plan: 30 पाण्याचे टँकर, 100 बोअरवेल खोदणार! पाणीटंचाई कृती आराखडा विभागीय आयुक्तांना सादर
NMC Water Scarcity Plan : राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार संभावित पाणीटंचाईचा कृती आराखडा शुक्रवारी (ता. २१) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर करण्यात आला.
यामध्ये शहरात नव्याने शंभर बोअरवेल खोदल्या जाणार आहे, तर गरज पडल्यास ३० टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी आउटसोर्सिंग केले जाणार आहे. (30 water tankers 100 bore wells nmc Water Scarcity Action Plan submitted to Divisional Commissioner nashik news)
‘अल निनो’ वादळा मुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाणी संकट निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या.
नाशिक महापालिकेकडून राज्याच्या मुख्य सचिवांकडे आराखडा सादर करण्यात आला. त्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एक दिवस तर जुलै व ऑगस्ट महिन्यात आठवड्यातून दोन दिवस, असे पाणीकपात करण्याचे नमूद करण्यात आले आहे.
परंतु मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्तांकडे निर्णय घेण्याचे अधिकार सोपविले. त्यानुसार महापालिकेला विभागीय आयुक्त गमे यांनी पत्र पाठवून २१ एप्रिलपर्यंत पाणीकपात संदर्भात तयार केलेल्या उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
त्यानुसार महापालिकेने अहवाल सादर केला, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. आराखड्यामध्ये सद्यःस्थितीत शहरात ११४८ बोअरवेल असून नव्याने शंभर बोअरवेल खोदल्या जाणार आहेत.
त्याचबरोबर नाशिक महापालिकेचे विभागनिहाय प्रत्येकी एक असे सहा टँकर आहेत. त्यांचाही गरज निर्माण झाल्यास ३० टँकर आऊटसोर्सिंगने घेऊन पाणीपुरवठा केला जाणार आहे. एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून एकदा पाणीकपात करण्याचे अहवालात नमूद आहे.
मेअखेर पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन जून व जुलै महिन्यात आठवड्यातून दोनदा पाणीकपात करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त आता पाणीकपातसंदर्भात निर्णय घेतील.