Nashik News : गुजरात सरकारची कांदा-बटाटा उत्पादकांना 330 कोटींची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

330 crore help from Gujarat government to onion and potato producers nashik news

Nashik News : गुजरात सरकारची कांदा-बटाटा उत्पादकांना 330 कोटींची मदत

नाशिक : देशात लेट खरीप कांद्याच्या (Onion) भावातील घसरणीचा विषय पेटलेला असताना गुजरात सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा दिला आहे. (330 crore help from Gujarat government to onion and potato producers nashik news)

फेब्रुवारीमध्ये विकलेल्या कांद्याला किलोला दोन, तर १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान शीतगृहात बटाटा साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना किलोला १ रुपया मदत दिली जाणार आहे. या शिवाय राज्याबाहेर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी ३३० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्याची घोषणा गुजरातचे कृषीमंत्री राघव पटेल यांनी मंगळवारी (ता.७) रोजी विधानसभेत केली.

महुवा (जि.भावनगर) येथील श्री खेतीवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष घनश्यामभाई पटेल यांनी गुजरात सरकारला कांद्यातील भावाच्या घसरणीबद्दल ८ फेब्रुवारीला पत्र लिहिले होते. अलीकडे पाच ते सहा विधानसभा सदस्यांना सोबत घेऊन त्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची भेट घेतली. त्यावर कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी विचारात घेत गुजरात सरकारने कांदा व बटाटा उत्पादकांसाठी अर्थसाहाय्य जाहीर केले. विधानसभेच्या नियम ४४ अन्वये ही मदत जाहीर करण्यात आली.

गुजरातमध्ये चालू रब्बी हंगामात लाल कांद्याचे ७ लाख टन उत्पादन होण्याचा सरकारचा अंदाज होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत गुजरातमध्ये दोन लाख टन अधिक बटाट्याचे उत्पादन अंदाज आहे. वाढलेली आवक व घसरलेले भाव यामुळे मोठा गोंधळ तयार झाला होता.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

राज्याबाहेर माल विकण्यास इच्छुक असलेल्या अथवा निर्यात करण्यास प्राधान्य देणाऱ्या शेतकऱ्यांना वाहतूक अनुदान दिले जाणार आहे. गुजरात सरकारने गेल्यावर्षी योजनेतंर्गत सौराष्ट्र प्रांतातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ७० कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून किलोला २ रुपये देण्यात आले होते. याशिवाय वाहतूक अनुदान म्हणून सरकार २० कोटी रुपयांची मदत देणार आहे. त्यामध्ये रस्ते वाहतुकीसाठी ७५० रुपये प्रतिटन, तर रेल्वे वाहतुकीस १ हजार १५० रुपये प्रति टन आणि निर्यातीसाठी उत्पादनाच्या वाहतूक खर्चाच्या २५ टक्के अशा मदतीचा समावेश आहे.

"गेल्या सहा वर्षात चौथ्यांदा कांदा भावात मोठी घसरण झाली. याच पार्श्वभूमीवर भावातील घसरण पाहता गुजरात सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मागणी गांभीर्याने विचारात घेत शेतकऱ्यांसाठी घोषणा केली. २ रुपये किलोप्रमाणे २० किलो वजनाच्या ५०० कट्ट्यांसाठी तर अधिक ५० हजार मदत दिली जाईल. बटाटा उत्पादकांना मदत मिळणार आहे." - घनश्याम पटेल, अध्यक्ष, श्री खेतीवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती, महुवा

टॅग्स :Nashikonioncrops