Nashik Crime News : ऐवज हिसकावणाऱ्या भामट्यांचा शहरात धुमाकूळ; एकाच दिवशी 4 घटना | 4 incidents of forced theft in single day nashik crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : ऐवज हिसकावणाऱ्या भामट्यांचा शहरात धुमाकूळ; एकाच दिवशी 4 घटना

Nashik Crime News : शहरात दुचाकींवरून धुमस्टाईल येणाऱ्या भामट्यांनी बळजबरीने ऐवज हिसकावून पोबारा करणाऱ्या भामट्यांनी गुरुवारी (ता. १) अक्षरश: धुमाकूळ घातला.

जयभवानी रोडला महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडली तर, मुंबई नाका हद्दीमध्ये दोघांचे मोबाईल हिसकावले असून, दिंडोरी रोडवर एकाच्या खिशातील रोकड बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. (4 incidents of forced theft in single day nashik crime news)

एकाच दिवशी जबरी चोरीच्या चार घटना घडूनही शहर पोलीस मात्र निद्रिस्त अवस्थेतच आहेत. कोणतीही उपाययोजना नाही, नाकाबंदी केवळ वसुलीचे नाके झाल्याने शहर पोलिसांना यातील एकाही गुन्ह्यातील संशयिताला जेरबंद करण्यात यश आले नाही.

उषा राजेंद्र शिंदे (रा. माऊली निवास, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता. १) रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्या जय भवानी रोडवरील राज प्रोव्हिजन किराणा दुकानासमोर असताना, पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक भामरे हे तपास करीत आहेत.

संतोष अभिमन्यु गडाख (रा. कानडे मळा, सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या गुरुवारी (ता. १) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या शौचालयाजवळ उभे होते. त्यावेळी ओम्नी व्हॅन त्यांच्याजवळ येऊन थांबली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या व्हॅनमधून अज्ञात चौघेजण उतरले आणि त्यांनी गडाख यांनी समजायच्या आत त्यांच्या खिशातील ११ हजार ५०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेत ओम्नी व्हॅनमधून पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक पडोळकर हे पुढील तपास करीत आहेत.

हाशिम नजमुद्दीन शेख (रा. गुलशननगर, वडाळागाव) या युवकाच्या फिर्यादीनुसार, तो गेल्या गुरुवारी (ता. १) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अशोका मार्गावरील मुंदडा कॉर्पोरेशनच्या समोर मोबाईलवर बोलत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्याच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला.

पुढील तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत. तर, नदीम मोहम्मद जावेद शेख (रा. रजा क्लासिक अपार्टमेंट, वडाळारोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता. १) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ते भाभानगरमधील नाईस मेडिकल येथे असताना, दुचाकीवरून आलेल्या भामट्याने त्यांच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक गेंगजे हे करीत आहेत.

नाकाबंदी नावाला

आयुक्तालय हद्दीमध्ये सकाळ-सायंकाळ नाकाबंदी केली जात असल्याचा दावा पोलीसांकडून केला जातो. मात्र नाकाबंदी असतानाही जबरी चोरी, वाहनचोरीच्या घटना घडत असून, एकाही गुन्ह्यात नाकाबंदीमध्ये संशयित पोलिसांच्या हाती लागल्याचे दिसून आलेले नाही. उलटपक्षी, नाकाबंदी ही पोलीसांसाठी वसुलीचे नाके झाले आहेत.

वाहतूक शाखेकडून तर केवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना टार्गेट करून वसुली केली जाते. तर, पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदी फक्त नावाला केली जाते. ही बाब चोरट्यांनी हेरून ते त्यांचे काम सफाईने करीत असल्याचेच दिसून येते.

टॅग्स :Nashikcrimethief