
MHT CET Exam : एमएचटी -सीईटीला 40 हजार विद्यार्थ्यांची हजेरी; आता निकालाची प्रतीक्षा
Nashik News : सीईटी सेलतर्फे आयोजित एमएचटी-सीईटी पार पडली आहे. एकूण बारा दिवस चाललेल्या या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातून ४० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
तर सुमारे अठराशे विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाची प्रतीक्षा लागून आहे. (40 thousand students attended MHT CET exam nashik news)
इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि बी.एस्सी (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. दोन टप्यांत झालेल्या या परीक्षेतील पहिल्या टप्यांत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची परीक्षा घेतली होती.
तर शनिवारी (ता.२०) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) ग्रुपची परीक्षा संपली आहे. प्रत्येक ग्रुपसाठी सहा दिवस अशी एकूण १२ दिवस ही परीक्षा पार पडली. यामध्ये सकाळ आणि दुपार असे दोन सत्रांमध्ये संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
या परीक्षेच्या कामगिरीच्या आधारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अभियांत्रिकी (बी.ई.), औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्म.), आणि बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षास प्रवेश दिला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कॅप राउंडची प्रक्रिया पार पडणार असून, या माध्यमातून प्रवेश निश्चिती केली जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ग्रुपनिहाय जिल्ह्यातील स्थिती अशी-
पीसीबी ग्रुप-
प्रविष्ट झालेले विद्यार्थी-----------२१ हजार ०६९
परीक्षेस उपस्थित विद्यार्थी--------१९ हजार ८२३
गैरहजर राहिलेले विद्यार्थी---------१ हजार २४६
उपस्थितीची टक्केवारी-----------९४.०८ टक्के.
पीसीएम ग्रुप-
प्रविष्ट असलेले एकूण विद्यार्थी--------२१ हजार ५२०
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी------------२० हजार ९१७
गैरहजर राहिलेले विद्यार्थी-------------६०३ गैरहजर
उपस्थितीची टक्केवारी---------------९७.१९ टक्के