Nashik Fraud Crime : सोलरसाठी 5 कोटींच्या कर्जाचे आमिष; चौघांना अटक | 5 crore loan lure for solar plant nashik fraud crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nashik Fraud Crime : सोलरसाठी 5 कोटींच्या कर्जाचे आमिष; चौघांना अटक

Nashik News : नव्याने सोलर प्लान्ट टाकण्यासाठी एकाला कर्जाची नितांत गरज असल्याचे हेरून संशयितांनी त्यांना आवश्‍यक असलेले ५ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. (5 crore loan lure for solar plant nashik fraud crime news)

त्या मोबदल्यात संशयितांनी १० लाखांची रक्कम घेतली. प्रत्यक्षात संशयितांनी कर्जदाराला बनावट डीडी देत गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटकही केली आहे.

मिलिंद मेश्राम (रा. पुणे), नितीन हासे (रा. संगमनेर, जि. नगर), बंटी मेडके (रा. राहुरी, जि. नगर), सागर वैरागर, अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, प्रणव राजहंस, भूषण बाळदे या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. राकेश उत्तम बोराडे (रा. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना नव्याने सोलर प्लान्ट तयार करावयाचा होता.

त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. सोलर प्लान्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी अनेक बँका व फायनान्स कंपन्यांकडे पाठपुरावा केला, परंतु यश येत नव्हते. संशयितांनी बोराडे यांना नेमके हेरले आणि त्यांच्याशी संपर्क साधला. वारंवार संपर्क साधून विश्‍वास संपादन केला आणि त्यांना बिनव्याजी ५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयितांनी रीतसर कागदपत्रांची माहिती घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच, कर्ज मंजूर झाल्याचा बँकेचा डीडी देण्याचेही बोराडे यांना सांगितले. त्यामुळे बोराडे यांचाही संशयितांवर विश्‍वास बसला. यासाठी संशयितांनी डीडी देण्यापूर्वीच बोराडे यांच्याकडून कर्ज मंजुरीपोटी १० लाख रुपये घेतले होते. त्यानंतर संशयितांनी बोराडे यांना ५ कोटी रुपयांचा डीडी दिला.

सदरील डीडी घेऊन बोराडे हे संबंधित बँकेत गेले असता, बँकेने सदर डीडी बनावट असल्याचे सांगितले. या वेळी फसवणूक झाल्याचे बोराडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ उपनगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपास सुरू केला आणि मिलिंद मेश्राम, नितीन हासे, बंटी बेडके, सागर वैरागर या चौघांना अटक केली आहे. तर अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहे. सदर कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे व गुन्हे शोध पथकाने केली आहे.