Citylinc Strike: सिटीलिंकचे 5 तास काम बंद आंदोलन; संप पुकारण्याची महिन्याभरातील दुसरी घटना | 5 hour Citylinc strike Second strike call in month nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citylinc Strike

Citylinc Strike: सिटीलिंकचे 5 तास काम बंद आंदोलन; संप पुकारण्याची महिन्याभरातील दुसरी घटना

Citylinc Strike : सिटीलिंक कंपनीच्या बस ऑपरेटरने सात चालकांना विनानोटीस अचानक कामावरून कमी केल्याने नाशिक रोड डेपोतील चालकांनी पाच तास काम बंद आंदोलन केले. चालकांना कामावर घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

परंतु, या दरम्यान सिटीलिंक कंपनीच्या सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना मात्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. मागील महिन्याभरातील बसचालक व वाहकांनी संप पुकारण्याची ही दुसरी घटना आहे. (5 hour Citylinc strike Second strike call in month nashik news)

मागील वर्षी दोनदा चालकांनी काम बंद केले होते. ११ एप्रिलला वेतन न दिल्याचे निमित्त करून वाहकांनी तपोवन डेपोत काम बंद आंदोलन पुकारले. दिवसभर चाललेल्या आंदोलनाची माघार सायंकाळी घेण्यात आली.

त्यानंतर गुरुवारी (ता.११) नाशिक व डेपोतील चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले. यामुळे सिटीलिंक कंपनीची सेवा पाच तास ठप्प झाली. बस ऑपरेटरने नाशिक रोड डेपोतील सात चालकांना गैरवर्तन केल्याने अचानक कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याने चालकांनी सकाळी एकत्र येत काम बंद आंदोलन केले.

डेपोतून सिटीलिंकच्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या. कंपनी व्यवस्थापनाकडून कामावरून कमी केलेले चालक व बस ऑपरेटर कंपनीच्या प्रतिनिधींची चर्चा करण्यात आली. कामावरून काढून टाकण्यापूर्वी नोटीस बजावणे आवश्यक असल्याची बाब समोर आली.

नोटीस न देता चालकांना कमी करण्यात आल्याने आंदोलन झाले. कमी केलेल्या चालकांना पूर्ववत कामावर घेण्याचे निर्देश दिल्यानंतर दुपारी एक वाजेपासून बस सेवा पूर्ववत सुरू झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

312 फेऱ्या रद्द

पाच तासांच्या आंदोलनामुळे 312 बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यातून महापालिकेचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ऑपरेटर कंपनीला सिटीलिंक कंपनीकडून सहा लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून, देयकातून सदरची रक्कम कपात करून घेतली जाणार आहे.

"सिटीलिंक बस ऑपरेटर कंपनीने चालकांना कामावरून काढून टाकण्यापूर्वी नोटीस देणे आवश्यक होते. कंपनीने केलेली कारवाई चुकीचे असल्याने या चालकांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले आहे. चालकांच्या गैरवर्तनासंदर्भात २१ मेपर्यंत निर्णय घेतला जाईल. कामबंद आंदोलनामुळे महापालिकेचे नुकसान झाल्याने बस ऑपरेटर कंपनीला सहा लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे." - मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक.