
Nashik Crime News: प्रॉडक्टची ऑनलाइन जाहिरातीचे आमिष पडले महाग; व्यावसायिक महिलेला 5 लाखांचा गंडा
नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रॉडक्टची ऑनलाइन जाहिरात करून व्यवसाय वृद्धी करून देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशातील भामट्यांनी महिला व्यावसायिकाला तब्बल पाच लाखांना गंडा घातला.
याप्रकरणात नाशिक सायबर पोलिसांनी शिताफीने तपास करीत, गाझियाबादमधून (उत्तर प्रदेश) एका भामट्याला अटक केली असून, त्यास नाशिक जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नीतिश रमेश कुमार (रा. खोडा कॉलनी, गौतम बुद्धनगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश), असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. तर दुसरा संशयित राम सोमवीर राघव (रा. शिवपुरी, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) याचा पोलिस शोध घेत आहेत. या संशयित भामट्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये सविता अविनाश पवार (रा. नाशिक) यांना ५ लाख १३ हजार २०० रुपयांना गंडा घातला होता.
सविता पवार यांचा कॉस्मेटिक प्रोडक्सट्स बनविण्याचा घरगुती व्यवसाय आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी फेसबुकवरील व्यापार इंन्फोइंडिया कंपनी नावाच्या फेजबुक पेजवर लाईक केले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून भामट्यांनी संपर्क साधून, ५ लाख १३ हजार २०० रुपये उकळले होते.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक सूरज बिजली, उपनिरीक्षक संदीप बोराडे यांनी तपास सुरु केला असता, ज्या बँक खात्यात सविता यांनी पैसे टाकले होते ते खाते व मोबाईल क्रमांक उत्तर प्रदेशातील गाडियाबादमधील नितीन रमेश कुमार, राज सोमवीर राघव यांचा असल्याचे समजले.
त्यानुसार सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन गाझियाबाद येथून नितीश कुमार यास शिताफीने अटक केली. त्यास स्थानिक न्यायालयात हजर करून ट्राझिंट रिमांड घेऊन नाशिकला आणले. नाशिक न्यायालयाने त्यास ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
''कोणीही सोशल मीडियावरील जाहिरातींना बळी पडू नये. ऑनलाइन व्यवहार करताना खात्री करूनच आर्थिक व्यवहार करावेत. अनोळखी ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करू नये. बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये. फसवणूक झाल्यास १९३० क्रमांकावर किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.'' - सुरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस, नाशिक.