
NMC Tax Concession : महापालिकेचा सवलतीचा फंडा फळाला! सवलत योजनेच्या कालावधीत 52 कोटीची वसुली
NMC Tax Concession : आर्थिक वर्ष पूर्ण होत असताना वसुलीचा तगादा लावण्यापेक्षा सर्वसामान्य ग्राहकांना सवलत देवून आधीच घरपट्टी वसुल करण्याचा फंडा विविध कर विभागाला कामी आला आहे.
कर सवलत योजनेच्या महिन्याच्या कालावधीमध्ये एक लाख २७ हजार ९९१ नागरिकांकडून ५२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. कर अदा करणाऱ्यांच्या आकडा एकूण करदात्यांच्या २५ टक्के आहे. (52 crores recovered during NMC Tax concession scheme period nashik news)
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी महापालिकेला स्वउत्पन्नात वीस ते पंचवीस टक्के वाढ करणे बंधनकारक आहे. त्यामुळे घरपट्टीची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक वसुली करण्यासाठी सवलत योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेत एप्रिल महिन्यात संपूर्ण घरपट्टी एकरक्कमी अदा केल्यास आठ टक्के, मे महिन्यात सहा तर जून महिन्यात तीन टक्के सवलत योजना आहे. १ ते ३० एप्रिल दरम्यान एक लाख २७ हजार ९९१ करदात्यांनी ५१ कोटी ८० लाखांची आगाऊ घरपट्टी भरली आहे.
यामध्ये मागील वर्षाच्या तीन कोटी थकबाकीचाही समावेश आहे. एकूण पंचवीस टक्के वसुली झाली असून एक महिन्यातील विक्रमी घरपट्टीची वसुली मानली जात आहे. मागील वर्षी घरपट्टीतून १८८ कोटी रुपये महसुल जमा झाला होता.
या वर्षी तेवढेच उद्दिष्ट देण्यात आले. आगाऊ घरपट्टी भरणाऱ्या मिळकत धारकांना दोन कोटी ७४ लाख ६६ हजार रुपये सूट मिळाली आहे. सौरऊर्जा प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाच टक्के सवलत देण्यात आली आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
करदाते व विभागनिहाय घरपट्टी वसुली (रुपयात)
विभाग करदाते वसुली
सातपूर १२,६०० सात कोटी ३८ लाख सहा हजार
पश्चिम १५,९९४ दहा कोटी ८३ लाख ३६ हजार
पूर्व २४,३४३ नऊ कोटी दहा लाख ६ हजार ४२४
पंचवटी २०,६३२ सात कोटी ९१ लाख ३७ हजार ३९३
सिडको ३२,१०८ आठ कोटी ९० लाख ५७ हजार ९३४
नाशिक रोड २२,३१४ सहा कोटी २१ लाख ८६ हजार ९०४
----------------------------------------------------------------------
एकूण १,२७,९९१ ५१ कोटी ८० लाख ८८ हजार ५४३