
BJP News: नाशिकमध्ये भाजपचे ‘जय श्रीराम'! पंचवटीच्या रामसृष्टीत 61 फुटी प्रभू श्रीराम शिल्प साकारणार
नाशिक : अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवरायांच्या स्मारकात सर्वात मोठी महाराजांची मुर्ती, तर अरबी समुद्रालाच लागून असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात भव्य मुर्ती उभारण्याचे काम सुरू असताना आता नाशिकच्या गोदावरी नदी किनारी वसलेल्या पंचवटी भागातदेखील राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून ६१ फुटी प्रभू श्रीरामचंद्राचे शिल्प उभारले जाणार आहे. (61 foot statue of Lord Shri Ram will made in Panchavati Ramshryshti Nashik BJP News)
त्यामुळे आता नाशिकमध्येदेखील प्रभू श्रीरामाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे. शासनाने शिल्पासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली असून, भाविकांसाठी ६१ फुटी शिल्प आकर्षण ठरेल, असा विश्वास आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी व्यक्त केला.
प्रभू श्रीरामाच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेल्या नाशिकला पुरातन काळापासून धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी हजारो भाविक रामतीर्थात स्नान, पूजा-विधीसाठी येतात. दर बारा वर्षानी येथे कुंभमेळा भरतो. हि बाब अनुसरून आमदार ढिकले यांनी तपोवनातील रामसृष्टीमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचे शिल्प उभारण्याची संकल्पना मांडली.
त्यासाठी ११ ऑक्टोंबर २०२२ मध्ये राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तपोवनातील रामसृष्टी उद्यानात जागा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.
जागेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६१ फुटी शिल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रामसृष्टीमध्ये प्रभू रामचंद्रांचे शिल्प उभारण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संगीत कारंजा व विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
त्याअनुषंगाने पर्यटन विभागाने प्रस्तावाला मंजुरी देताना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता तपोवन हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र होईल. असा दावा आमदार ढिकले यांनी करताना महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात कामे रखडली होती.
परंतु राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आठ महिन्यात मोठे प्रकल्प आणले. त्यात पेठ रोड तयार करण्यासाठी ७३ कोटी रुपये, पेठ रोड येथे ९९ कोटी रुपयांचे आदिवासी विद्यार्थी मध्यवर्ती संकुल, नांदूर नाका येथे ५० कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल, सारथीसाठी ५० कोटी रुपये, मालेगाव स्टॅन्ड येथे तीनशे बेडचे रुग्णालयाची मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले.
"रामतीर्थावर धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना प्रभू रामचंद्रांचे स्मरण करण्याच्या दृष्टीने ६१ फूट भव्य शिल्प उभारण्यास मंजुरी देताना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने शासनाचे आभार. प्रस्तावित शिल्प भाविकांचे आकर्षण ठरेल."- ॲड. राहुल ढिकले, आमदार