
NMC Budget : शहरात नव्याने 821 कोटींचे रस्ते; अंदाजपत्रकाला मंजुरी
नाशिक : महापालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये १८९ कोटी रुपयांचे नवीन रस्ते तयार केले जाणार आहे. यापूर्वी कार्यारंभ आदेश दिलेल्या ६२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे नवीन वर्षात रस्त्यांवर ८२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
महापालिकेचे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे दोन हजार ४७७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आल्यानंतर मंगळवारी (ता. २८) महासभेला महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अंदाजपत्रक सादर केले. (821 crore new roads in city Approval of budget Nashik NMC Budget news)
स्थायी समितीला सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात कुठलाच बदल न करता जशाच्या तसे अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. महसुली खर्च वजा जाता भांडवली खर्चासाठी ७०१ कोटींची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली. अंदाजपत्रकात २९९ कोटी रुपयांचा निधी बांधकाम, विद्युत, उद्यान विभागाला देण्यात आला.
बांधकाम विभागासाठी १८९ कोटी रुपयांची तरतूद रस्त्यांसाठी करण्यात आली आहे. यापूर्वी ६२५ कोटी रुपयांच्या रस्ते कामाला मंजुरी देण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत या कामांवर ३४४ कोटी ३४ लाख रुपये खर्च झाले. मार्चअखेरपर्यंत जवळपास ७० कोटी रुपये खर्च होतील.
पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात पेठ रोड साठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमधील गरवारे पॉइंट ते एक्स्लो पॉइंट व पुढे पपया नर्सरी दरम्यान ४० कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार केला जाणार आहे. जुना सीबीएस ते कॅनडा कॉर्नर, कॅनडा कॉर्नर ते जुना गंगापूर नाका दरम्यान रस्ता तयार केला जाणार आहे.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. आडगाव शिवार, मते नर्सरी रोड, नरसिंहनगर चौक, सिडको रणभूमी रस्ता, प्रभाग ३१ मधील एकता व्हॅली सह महापालिका हद्दीत शंभर कोटी रुपयांचे नवीन रस्ते तयार केले जाणार आहे. अंदाजपत्रकात १८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सुरू असलेली रस्त्यांची कामे (आकडे कोटीत)
विभाग प्राकलन रक्कम अपेक्षित खर्च
पूर्व ९९ ४१
नाशिकरोड ७६ ४६
सिडको ११२ २७
पंचवटी १६२ ४४
सातपूर १४३ १२
पश्चिम ४७ १५