घोरवड घाटात आढळली अपघातग्रस्त कार अन् चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accidental car

Nashik News: घोरवड घाटात आढळली अपघातग्रस्त कार अन् चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर- घोटी महामार्गावर घोरवड गावाजवळ काल रात्री दहाच्या सुमारास एक अपघातग्रस्त कार आढळून आली.

या कारचा पूर्ण चक्काचुर झालेला होता . ही कार महामार्गालगतचा कठडा तोडून लगतच्या विहिरीला धडकली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (accident car found in Ghorwad ghat dead body of driver found in hanged state Nashik News)

मात्र, या चालकाचा मृतदेह तेथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जयभवानी येथे रसवंतीच्या शेडच्या अँगलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सकाळी आढळून आला आहे. घटनेची माहिती समजताच सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हरिश्चंद्र गोसावी, पोलीस नाईक विनायक आहेर, गौरव सानप, निवृत्ती गीते अंकुश दराडे आदींनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली व पंचनामा केला

सुरुवातीला कारचालकाचा शर्ट शेजारील डोंगराच्या पायथ्याशी सापडला. त्यानंतर कारचालकाचा मृतदेह पोलिसांना कारजवळ नव्हे तर हॉटेल जयभवानी सिन्नर महामार्ग येथे म्हणजे अपघात घडला त्या ठिकाणापासून तब्बल चार किलोमीटर अंतरावर शेडच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कारचालकचा अपघात होऊन तो हॉटेल जय भवानी येथे येऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, अपघाताचा बनाव करुन आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहे, अशीही चर्चा आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

आकाश मोहन खताळे (वय 24) रा. अंबड चिंचाळे असे या कारचालकाचे नाव आहे. कारचालक हा पांढुर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता, मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अपघाताच्या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. याबाबत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी तपास करीत आहेत.