Accident News : पुणे- शिंदखेडा एसटी बस उलटल्याने चौघे जखमी | Accident News Four injured as Pune Shindkheda ST bus overturns nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Overturned bus on Manmad road.

Accident News : पुणे- शिंदखेडा एसटी बस उलटल्याने चौघे जखमी

Accident News : मनमाड-मालेगाव रस्त्यावरील कौळाणे शिवारातील राजस्थान ढाब्यासमोर पुणे-शिंदखेडा बस (एमएच २०, बीएल ३१२६) उलटल्याने बसमधील चौघे प्रवासी जखमी झाले. चौघांपैकी एक जण गंभीर जखमी झाला.

जखमींमध्ये मायलेकीसह तिन महिलांचा समावेश असून, जखमींवर सामान्य व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Accident News Four injured as Pune Shindkheda ST bus overturns nashik news)

गुरुवारी (ता. २७) दुपारी पाऊणेचारच्या सुमारास हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा संशय आहे. पुण्याहून शिंदखेड्याकडे निघालेली बस शहराजवळील कौळाणे शिवारात अचानक उलटली.

बस रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटल्याने बसच्या सर्व काचा फुटल्या व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातात लताबाई रमेश बैसाणे, दिक्षा रमेश बैसाणे (दोघे रा. चंद्रमणी नगर, द्याने) या मायलेकींसह लिलाबाई सुधाकर भालेराव (मालेगाव) व पंकज किसन फापळे (रा. मनमाड) हे चौघे प्रवासी जखमी झाले.

तिघे किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात, तर पंकज फापळे यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलिस, माजी नगरसेवक मदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व रुग्णवाहिका चालक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आगार प्रमुख मनिषा देवरे, मुख्य लिपिक विशाल गोसावी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी पाचशे रुपये दिले. संबंधितांकडून उपचारासाठी लागणारी मदत म्हणून बी फार्म भरुन घेण्यात आले आहेत. तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

दरम्यान, बसचे ब्रेक लायनर फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. येथील आगाराच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी बस बाहेर काढल्यानंतर ती आगारात आणण्यासाठी प्रयत्न केले असता, ब्रेक लायनर व्यवस्थित असल्याचे समजले.

यामुळे अपघात नेमका कसा झाला याबाबत निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. सुदैवाने बसचा वेग कमी असावा यामुळे प्रवाशांना फारशी इजा झाली नाही.

टॅग्स :Nashikaccident case