Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला जन्मठेप

नाशिक : कुटूंबियांना मारून टाकीन अशी धमकी देत, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. (Accused gets life imprisonment in case of rape of minor girl Nashik Crime News)

प्रविण प्रकाश किरवे (२२, रा. वीर सावरकरनगर, जेलरोड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रविण याने जुलै ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.

पीडितेस जीवे मारण्याची धमकी देत ओमनगर व नांदुरनाका येथे अत्याचार केले होते. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे प्रविणविरोधात फिर्याद दिली.त्यानुसार, उपनगर पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

तत्कालिन महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या तेली यांनी गुन्ह्याचा तपास करीत, न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. मलकापट्टे-रेड्डी यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षातर्फे ॲड. दिपशिखा भीडे यांनी कामकाज पाहत सात साक्षीदार तपासले.

प्रविणविरोधात परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदार यांच्या आधारे गुन्हा शाबित झाल्याने न्यायालयाने आरोपी प्रविणला जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक के.के. गायकवाड, पी.आय. खान यांनी पाठपुरावा केला.