State Excise Department : ‘एक्साईज’कडून महसुलात 80 टक्के उद्दिष्ट साध्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Excise Department

State Excise Department : ‘एक्साईज’कडून महसुलात 80 टक्के उद्दिष्ट साध्य

नाशिक : वाईन कॅपिटल सिटी म्हणून नावारुपाला आलेल्या नाशिक जिल्ह्याचा राज्याच्या महसुलात मोठा वाटा असतो.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात महसुलाच्या माध्यमातून सुमारे ८० टक्के उद्दिष्ट साध्य केले असून, फेब्रुवारीअखेर ४ हजार ६९० कोटी रूपये राज्याच्या तिजोरीत जमा झाले आहेत. (Achieved 80 percent target in revenue from State Excise Department nashik news)

गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक जिल्हा वाईन कॅपीटल सिटी म्हणून देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारुपाला आला आहे. द्राक्षाच्या वाईनसह जांभळापासूनही वाईनची निर्मिती होते. याशिवाय, जिल्ह्यात मद्याची निर्मिती केली जाते.

२०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला नाशिक जिल्ह्यासाठी ५ हजार ८७९.३० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यासाठी विभागाच्या नाशिक जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून गेल्या ११ महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत ४ हजार ६९०.४२ कोटी रुपये म्हणजेच एकूण उद्दिष्टाच्या ७९.७७ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

मार्चमध्ये उर्वरित महसूल संकलित करून उद्दिष्ट साध्य केले जाईल, असा विश्‍वास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

गतवर्षापेक्षा जादा महसुल

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ या वर्षी फेब्रुवारीअखेर ३ हजार ८३६.०३ कोटी रुपयांचा महसुल संकलित केला गेला. त्या तुलनेत यंदा (२०२२-२३) जिल्हा अधीक्षक कार्यालयाने ४ हजार ६९०.४२ कोटींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. याशिवाय विविध कारवाया करून लाखोंचा मद्यसाठाही जप्त केला आहे.

"अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षापेक्षा यंदा महसुलात वाढ झाली आहे." -शशिकांत गर्जे, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक.