Sharad Ponkshe : स्वा. सावरकरांनाही काँग्रेसची ऑफर होती पण...; अभिनेते शरद पोंक्षे | Actor Sharad Ponkshe statement about savarkar at parshuram saikhedkar sabhagruh nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Sharad Ponkshe speaking at a lecture organized by the public library on Monday.

Sharad Ponkshe : स्वा. सावरकरांनाही काँग्रेसची ऑफर होती पण...; अभिनेते शरद पोंक्षे

Sharad Ponkshe : स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगातील शिक्षेतून बाहेर पडल्यानंतर १९३७ मध्ये त्यांना सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पण काँग्रेसने हिंदू राष्ट्रवाद झुगारून मुस्लिमांचा लांगुलचालन करणारा हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला.

हिंदू राष्ट्रवादाच्या विचारांशी यत्किंचितही प्रतारणा होता कामा नये, या विचारांती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, असे परखड विचार अभिनेते, वक्ते शरद पोंक्षे यांनी मांडले. (Actor Sharad Ponkshe statement about savarkar at parshuram saikhedkar sabhagruh nashik news)

स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे सोमवारी (ता.२९) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात त्यांनी ‘सावरकर विचारदर्शन’ विषयावर आपले विचार मांडले. या वेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष सुनील कुटे, कार्याध्यक्ष गिरीश नातू, ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, गणेश बर्वे व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पोंक्षे यांनी भाषणाच्या प्रारंभीच इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींवर बंदी घातली. यानंतर ते म्हणाले, स्वा. सावरकरांना इंग्रजांनी द्वेषापोटी नियम धाब्यावर बसवून शिक्षा दिली. त्याच सावरकरांनी हिंदू राष्ट्राची व्याख्या केली आहे.

हिंदू म्हणजे ते म्हणतात, हिमालयापासून ते सिंधु नदीपर्यंतचा प्रांत स्वतःची पुण्यभूमी मानणारे खरे हिंदू आहेत. आजचे हिंदुत्व हे फार बेगडी आहे. स्वतः पुरते विचार करणाऱ्या राजकीय लोकांमुळे कुठलाही पक्ष सेक्युलर राहिलेला नाही.

अशा परिस्थितीत हिंदुत्वाची व्याख्या युवकांना समजून सांगण्यासाठी सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या युवकांना इतिहास फारसा माहीत नसल्यामुळे त्यांना ‘माफीवीर सावरकर’ म्हटले तरी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ माहीत नसतात.

त्यामुळे मनात इच्छा असूनही उत्तर देता येत नाही. देशातील सुंदर संस्कृती लयास चालली आहे, असेही त्यांनी म्हटले. सावानाचे कार्याध्यक्ष गिरीश नातू यांनी प्रास्ताविक केले. अॅड. भानुदास शौचे यांनी सूत्रसंचालन केले. जगातील कुठल्याही देशात भारतासारखी संस्कृती अस्तित्वात नाही.

त्या देशातील बहुसंख्य लोकांचा धर्म तिथे पाळला जातो. त्याचा स्वीकार करूनच इतर धर्मीय किंवा अन्य देशातील लोक तिथे राहतात. त्यांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून ते जगतात.

भारतात साधारणतः ९०० वर्षांपूर्वी आलेले मुस्लिम आजही हिंदू संस्कृती मानत नाहीत. मका, मदिना हे त्यांचे धर्मक्षेत्रे आहेत. त्यामुळे मुस्लिम धर्मीय हे भारतातील पाहुणे आहेत. तर ख्रिश्चनही याच प्रकारात मोडत असल्याचे शरद पोंक्षे म्हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काय म्हणाले शरद पोंक्षे?

*राहुल गांधी हे गांधी घराण्याचे मूळ वारसदार नाही

* राहुल गांधींना स्वा. सावरकरांचे संदर्भ माहीत नाहीत

* सावरकर काँग्रेसमध्ये गेले असते तर लोक गांधीजींना विसरले असते

* काँग्रेसने ७५ वर्षे मुस्लिमांचे पराकोटीचे लांगूलचालन केले

* हिंदी राष्ट्रावादामुळेच देशाची फाळणी

*छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर नव्हते

* स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही काँग्रेसने सावरकरांना दोन वेळा जेलमध्ये ठेवले

* ‘संसद भवन’ हा शब्दच सावरकरांनी निर्माण केला

* तुम्ही शिव्या देत रहा, आम्ही सावरकरांचे विचार पोचवत राहू