Nashik Air Service : नाशिकच्या विमानसेवेसाठी आदित्य ठाकरेंची मध्यस्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray & Jyotiraditya scindia

Nashik Air Service : नाशिकच्या विमानसेवेसाठी आदित्य ठाकरेंची मध्यस्थी

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवानेते व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या विमानतळाबरोबरच हवाई समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मध्यस्थी केली आहे.

राज्यातील इतर महत्त्वाच्या विमानतळांबरोबरच नाशिकच्या विमानसेवेचे प्रश्‍न सोडविल्यास प्रगतीतील अडथळे दूर होतील, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. (Aditya Thackeray writes letter to jyotiraditya scindia meditation for Nashik air service news)

गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यात सत्तांतरण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला. निवडणूक आयोगाने, तर शिवसेना नावासह चिन्हदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिले.

त्यानंतर शिवसेना ही सत्तेत किंवा सभागृहात नाही, तर लोकांमध्ये असल्याचे सांगत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात जाहीर सभांचा धडाका सुरू केला. त्याचबरोबर स्थानिक प्रश्‍नांना वाचा फोडत ते प्रश्‍न शासनदरबारी सोडवण्यासाठी पाठपुरावही सुरू केला.

गेल्या महिन्यात आदित्य ठाकरे यांचा नाशिक व मालेगाव दौरा झाला. त्या वेळी ‘आयमा’च्या एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी विमान सेवेसंदर्भातील समस्या त्यांच्याकडे मांडल्या. विमानसेवा सुरू झाल्यास नाशिकच्या विकासाला चालना मिळेल, असे साकडे त्यांना घालण्यात आले.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी नाशिकच्या विमानसेवेसंदर्भात पत्रव्यवहार करून समस्या सोडविण्याची मागणी केल्याने स्थानिक प्रश्‍नांवर ठाकरे पिता-पुत्र मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

विमानतळाचा प्रश्‍न सोडवा

नाशिकचे ओझर विमानतळ हा महाराष्ट्रासाठी आणखी एक मोठा त्रासदायक प्रश्‍न आहे. नाशिक हे पवित्र शहरांपैकी एक आहे, ज्यास पुण्यासारखाच समृद्ध वारसा आहे आणि विमानतळ कनेक्टिव्हिटीसह वापरण्याची मोठी क्षमता आहे.

विमानतळामध्ये सर्व सुविधा आहेत, ज्यासाठी ते जागतिक दर्जाचे बनवणे आवश्यक आहे, तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये नाशिकला उर्वरित भारत आणि जगाशी जोडणाऱ्या उड्डाणांची संख्या कमी करण्याचा अन्यायकारक पक्षपातीपणा दिसून आला आहे.

त्यामुळे नाशिकला न्याय द्यावा आणि देशाच्या इतर भागांत विमानसेवा सुरू करावी. नाशिकच्या विमानसेवेचा संबंध उद्योग, कृषी, पर्यटन वाढीशी असल्याने समस्या सोडवावी.