Nashik News | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : अद्वय हिरे | Latest Marathi News | Shivsena News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Advaya Hire while addressing the workers after being elected as Deputy Leader

Nashik News: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : अद्वय हिरे

मालेगाव (जि. नाशिक) : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेते पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. मी एकटा उपनेता नसून सर्वच शिवसेना कार्यकर्ते हे उपनेते आहेत.

आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणत पक्षप्रमुख ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी येथे केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर श्री. हिरे यांचे प्रथमच मालेगावात आगमन झाले. येथील गिरणा पुलावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्री. हिरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

मिरवणूक मोसमपुल मार्गे शिवतीर्थावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. मोसम चौकातील महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांनाही हार अर्पण करण्यात आला.

लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करत त्यांनी केबीएच विद्यालय प्रांगणातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. या ठिकाणी झालेल्या सत्कार सभेत ते बोलत होते.

श्री. हिरे म्हणाले की, मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई आपल्या ताब्यात येणार नसल्याचे हेरूनच भाजपने शिवसेना संपविण्याचा डाव आखला. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

भाजपचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही. शिवसेनेमुळेच मुंबईतील मराठी माणूस जिवंत आहे. ती शिवसेना जगली पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे. त्याच भावनेतून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या मनात ठाकरे घराण्याबद्दल प्रेम व आदर आहे. गद्दारी करणाऱ्यांविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल.

पक्षप्रमुख ठाकरे यांची २६ मार्चला मालेगावला महाविराट सभा होत आहे. ठाकरेंची सभा आगामी २०२४ मधील निवडणुकीतील परिवर्तनाची नांदी असेल. मालेगाव तालुका भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्री यांचे नाव न घेता टीका केली.

यावेळी पवन ठाकरे, रामा मिस्तरी, नथू देसले, प्रमोद शुक्ला, शेखर पगार आदींची भाषणे झाली. सभेला लकी खैरनार, कैलास तिसगे, नथू जगताप, अशोक आखाडे, दशरथ निकम, नंदलाल शिरोळे, भारत म्हसदे, महेश पवार, राजाराम जाधव, भरत पाटील, जितेंद्र देसले, काशिनाथ पवार आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते