
Nashik News: तब्बल वीस तासांनी सापडला पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकातील जवानाचा मृतदेह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील जवानाच्या दुचाकीचा अपघात झाला होता. शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेऊन परत येत असताना ही घटना घडली होती. यावेळी जवानासोबत पत्नी आणि दोन मुलेही होती. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात गोदावरी कालव्यात हे सर्व जण पडले. पत्नी आणि मुलांना स्थानिकांच्या मदतीने कालव्यातुन बाहेर काढण्यात आलं. मात्र जवान गणेश गिते पाण्यात वाहून गेले आहेत.
गणेश सुखदेव गिते (वय ३६) या जवानाचा गोदावरी कालव्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अथक शोध मोहिमेनंतर काल (शुक्रवारी) तब्बल वीस तासांनी सापडला आहे. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी आलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांना घेराव घातला.
जवान गणेश गिते गुरुवारी संध्याकाळी कालव्याच्या प्रवाहात बुडाले. तब्बल बारा तासांनंतरदेखील त्याचा ठावठिकाणा न लागल्यामुळे जिल्हास्तरीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहिमेला गती दिली.
पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत शिर्डी येथे साईदर्शन करून घराकडे परतणाऱ्या गणेश यांची दुचाकी ब्राह्मणवाडे-मेंढी रस्त्यावरील पुलावरून कालव्यात कोसळली होती. पाण्यात पडलेल्या या चौघांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी कालव्यात उड्या मारल्या. गणेश यांची पत्नी रूपाली (३०), मुलगी कस्तुरी (७) व मुलगा अभिराज (दीड वर्ष) यांना वाचविण्यात यश आले.
या तिघांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे गणेश गिते मात्र पाण्यात बुडून बेपत्ता झाले. रहिवाशांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. गोदावरी कालव्याला नुकतेच आवर्तन सुटल्याने पाण्याचा वेग अधिक होता.त्यामुळे त्यांचा मृतदेह वाहून गेला.
शुक्रवारी सकाळी यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी दौरा रद्द करून अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी प्रशासनाच्या गलथानपणामुळे घटनेचे गांभिर्य वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे जवानाचा मृतदेह सापडला नाही असा आरोप करत ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला.