esakal | ''दोषींना फाशी झाल्याशिवाय आत्मा शांत होणार नाही''; कुटुंबावर मोठा आघात

बोलून बातमी शोधा

nashik oxygen
''दोषींना फाशी झाल्याशिवाय आत्मा शांत होणार नाही''; कुटुंबावर मोठा आघात
sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता.२१) प्राणवायूच्या गळतीमुळे २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. कुणाला यात यश आले, तर कुणाला अपयश. या मृत्यूच्या तांडवात अनेकांनी आपले वडील, पती, पत्नी, आई, भाऊ गमविला. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही ही कुटुंबे अजूनही दु:खाच्या सावटात आहेत, तर कोणी रुग्णालयात दाखल असलेल्यांसाठी अजूनही धावपळ करत आहे. ज्यांनी आपले आप्तेष्ठ गमविले आहे, त्यांच्यामागे आता केवळ त्यांच्या आठवणी उरल्या आहेत

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

दोषींना फाशी झाल्याशिवाय आत्मा शांत होणार नाही

सिडको येथील रहिवासी असलेल्या प्रमोद वाळूकर यांचा या घटनेत मृत्यू झाला. वाळूकर कुटुंबीयांवर त्यांच्या जाण्याने मोठा आघात झाला असून, आमचा मोठा आधार पाठीराखाच गेल्याचे त्यांचे बंधू परिक्षित वाळूकर यांनी सांगितले. मृत प्रमोद वाळूकर यांनी सहा वर्षांची मुलगी असून, तिचे पितृछत्र हरपले आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचा खूनच संबंधित यंत्रणेकडून झाला आहे. जोपर्यंत या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांना फाशी होत नाही, तोपर्यंत त्याच्या आत्म्यांना शांती लाभणार नाही. मुख्यमंत्री यांनी याप्रकरणात लक्ष घालावे; अन्यथा या सर्वांची तळतळ त्यांना लागेल, असे परिक्षित वाळूकर यांनी सांगितले.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

माझे सर्वच हरपले...

प्रगतीनगर येथील प्रवीण महाले (३३) यांनादेखील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या घटनेत मृत्यूने कवटाळले. मृत प्रवीण पत्नी व आई-वडिलांसह राहत होते. लॉकडाउनमुळे कंपनी बंद पडल्याने ते घरीच होते. याचदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ऑक्सिजन गळतीच्या घटनेत त्यांना मृत्यू झाला. या घटनेने आमच्या सर्व कुटुंबीय व माझा मोठा आधारच हरपला असल्याचे मृत प्रवीण महाले यांच्या पत्नी यांनी सांगितले.

आता घरात करायलाच कोणी राहिले नाही

पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या वैशाली सुनील राऊत (४६) यांचा डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने आता राऊत कुटुंबीयांच्या घरात करायलाच कुणी राहिले नाही. वैशाली राऊत यांच्यामागे दोन मुले व पती असून, पतीही कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्री. राऊत यांची परिस्थितीही बेताचीच आहे. त्यांची एक बहीण असून, त्या दिव्यांग असल्याने राऊत कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला असल्याचे मृत वैशाली राऊत यांचे बंधू संतोष वाघ यांनी सांगितले.

दोन मुलींच्या डोक्यावरील छत्र हिरावले

अंबड लिंक रोड परिसरातील म्हाडा कॉलनीत राहणारे सुनील झाल्टे (३३, रा. आर्णी, धुळे) यांचाही या घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कोवळ्या दोन लहान मुलींच्या डोक्यावरील छत्रच हरविले आहे. यात मोठ्या मुलीचे वय पाच, तर लहान मुलीचे वय अवघे तीन वर्षे आहे. शुक्रवारी (ता. २३) मोठ्या मुलीचा पाचवा वाढदिवस होता. सुनील झाल्टे यांनी वाढदिवशी घरी घेऊन जाण्याची मागणी मेहुणे अविनाश बिऱ्हाडे यांच्याकडे केली होती. मात्र, दोन दिवस अगोदरच मृत्यूने त्यांना कवटाळले. श्री. बिऱ्हाडे म्हणाले, की २४ तासांनंतरही अजून सर्व दु:खात आहोत. मुलींना काय घटना घडली आहे, याची कल्पना नाही. आता कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आमच्यावरच असून, समोर दु:खाचा डोंगर उभा आहे.