
Nashik News : आक्रमक ठेकेदारांचा सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठिय्या!
नाशिक : दिवाळीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे होऊनही देयके मिळत नसल्याने आक्रमक झालेले ठेकेदार मार्च एण्डींगला पुन्हा आक्रमक झाले आहेत. मार्च अखेरीस नाशिक जिल्ह्यातील कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ ४६.४० कोटी रुपये निधी दिला असून त्यातून प्रत्येक ठेकेदाराला त्याच्या देयकाच्या सहा टक्के रक्कम दिली जात आहे.
कामे पूर्ण करूनही केवळ सहा टक्के रक्कम हाती पडणार असल्याने संतप्त झालेल्या ठेकेदारांनी बुधवारी (ता.२९) सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता यांच्या दालनात तसेच कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी ठेकेदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी अधीक्षक अभियंता यांनी मंत्रालयात सचिवांशी बोलणी करून पुढच्या दोन दिवसांमध्ये आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (Aggressive contractors stay in public works office Nashik News)
सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक जिल्ह्यात मंजूर केलेल्या इतर जिल्हा मार्ग व राज्य मार्गांची सुमार ७०० कोटींची कामे पूर्ण होऊन ठेकेदारांनी संबंधित विभागाकडे देयकांची मागणी केली आहे. मात्र, मार्च अखेरीस जिल्ह्यातील कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ ४६.४० कोटी रुपये निधी दिला आहे.
त्यातून प्रत्येक ठेकेदाराला त्याच्या देयकाच्या सहा टक्के रक्कम देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. कामे पूर्ण करूनही केवळ सहा टक्के रक्कम हाती पडणार असेल, तर ठेकेदारांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न ठेकेदारांनी उपस्थितीत करत, आक्रमक पवित्रा घेतला.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
देयके मिळत नसल्याने संतप्त ठेकेदारांनी अधीक्षक अभियंता यांच्या दालनात जाऊन ठिय्या मांडला. झालेल्या कामांचे देयके मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ठेकेदारांनी घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता व ठेकेदार यांच्यात वादंग देखील झाले.
आंदोलनात भाऊसाहेब सांगळे, सुनील कांदे, रमेश शिरसाट, राजेंद्र पानसरे, शिवाजी घुगे, एम. टी. पाटील, अनिल सोनवणे, अभय चौक्सी, विजय घुगे, अजित सकाळे, नीलेश पाटील, समीर साबळे, जर्नादन सांगळे, विलास निफाडे, भास्करराव सोनवणे, संदीप दरगोडे, पी. पी. सांगळे, संजय आव्हाड, योगेश पाटील, राजू काकड, उत्तम पोकळे, बबलू पठाण, राजू कुराडे, मधुकर मवाळ, नंदू खताळे, अरुण खताळे, माधव आव्हाड, सागर विंचू, विजय नागरे, गणपत हाडपे, सागर सोनवणे आदी सहभागी झाले होते.