Nashik News : महामार्गावर सोनसाखळी चोरट्याला बेदम चोप; वृद्धाची सतर्कता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 theft gold chain

Nashik News : महामार्गावर सोनसाखळी चोरट्याला बेदम चोप; वृद्धाची सतर्कता

नाशिक : बसस्थानकावर बसमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी होते. या गर्दीचा फायदा चोरट्यांकडून (Thief) घेतला जातो. (alert elderly passenger nabbed suspect as thief tried to pull gold chain from passengers neck highway bus stand nashik news)

असाच प्रकार महामार्ग बसस्थानकात गर्दीत प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला असता, एका वृद्ध प्रवाशाच्या सतर्कतेने संशयिताला पकडला.

नागरिकांनी बेदम चोप दिल्यानंतर त्यास मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले. संजय उर्फ सौरभ राजू माने (३७, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, पोलिस चौकशीतून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अर्जून नारायण बडगुजर (६३, रा. पांडवनगरी, इंदिरानगर, नाशिक. सध्या रा. गुलमोहर रोड, अहमदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. २४) दुपारी ते अहमदनगरला जाण्यासाठी मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात आले होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बसस्थानकात असलेल्या नाशिक - श्रींगोंदा बस आली असता, बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. त्यावेळी संशयित माने याने गर्दीमध्ये घुसून एका प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचण्याचा प्रयत्न केला.

सदरची बाब बडगुजर यांच्या लक्षात आली. त्यांनी सतर्कता बाळगत संशयित माने याचा हात पकडला आणि आरडाओरडा केला. त्यामुळे नागरिकांनी संशयित माने याला पकडून बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच हाकेच्या अंतरावर असलेले मुंबई नाका पोलिसांनी धाव घेतली.

संशयित मानेला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे तपास करीत आहेत. दरम्यान, पोलीस चौकशीतून संशयितांकडून आणखीही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikthiefGold jewelry