
Nashik Bribe Crime : आठवडाभरात भूमिअभिलेखचा दुसरा लाचखोर लिपिक जाळ्यात
नाशिक : आठवड्यापूर्वी भूमिअभिलेख विभागाचा अधिकारी लाच घेताना पकडला असताना सोमवारी (ता. २७) त्याच विभागातील दुसरा लिपिक ४० हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आला.
जमीन मोजून देण्यापोटी प्रत्येकी ४० हजार आणि मोजणीचे नकाशे तयार करून देण्यासाठी दोन लाख याप्रमाणे चौघांकडून सुमारे अडीच लाखांची लाचखोर लिपिकाची मागणी होती. प्रतिलिपी लिपिक नीलेश शंकर कापसे (वय ३७, रा. उदयनगर, मखमलाबाद रोड) असे लाच घेताना पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे. (Another bribe taking clerk of land records in week Nashik Crime News)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भूमिअभिलेख कार्यालयातील कापसे याला ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. नाशिक तालुक्यातील पळसे शिवारात शेतातील गट क्रमांकाच्या खुणा दर्शविण्यासह कच्चा नकाशा देण्यासाठी लाचेची मागणी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पळसे येथील ३० वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रतिलिपी लिपिक संशयित नीलेश कापसे याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकाची मोजणी करून कच्चा नकाशा देण्यासह पोट हिस्स्याच्या खुणा दर्शवून नकाशा देण्यासाठी आणि त्यानंतर स्वाक्षरी व शिक्क्यांसाठी अडीच लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली.
वडिलोपार्जित जमिनीत हिस्सेदार असलेल्या चौघांना जमीन मोजून त्याचे गट निश्चित करायचे असल्याने त्यांनी भूमिअभिलेख विभागाकडे अर्ज केला होता. पण एका गटातील जेवढे हिस्से मोजून द्यायचे त्या प्रत्येक खातेदाराकडून मोजणीचे दहा हजार आणि मोजणीनंतर कच्चा नकाशा करून देण्यापोटी प्रत्येकी ४० हजार याप्रमाणे कापसे याने लाच मागितल्याने तक्रारदाराने त्या वेळी तडजोडीअंती प्रतिगट दहा हजार, असे चार गटांचे चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी कापसेने केली.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक अधीक्षक नारायण न्याहाळदे आणि उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, कर्मचारी एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने सोमवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास सीबीएसजवळील भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचून संशयित नीलेश कापसे यास लाच घेताना पकडले.
या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या घराची झडती, कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू होते.
५७ दिवसांत २८ सापळे
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदाच्या २०२३ या वर्षातील दोन महिन्यांतील ५७ दिवसांत आज २८ वा सापळा लावला. दर दोन दिवसांनी एक, याप्रमाणे २८ लाचखोर विभागाने जेरबंद केले आहेत. भूमिअभिलेख विभागात तर कमालच झाली.
आठवड्यापूर्वी अधीक्षक दर्जाचा अधिकारी लाच घेताना पकडला गेला असताना तेथे पुन्हा लाच मागणे सुरूच असल्याचे आजच्या सापळ्यानंतर उघडकीस आले. त्यामुळे सगळ्यात तालुक्यात आता भूमिअभिलेख विभागातील लाचखोरी मोडीत निघावी, अशी मागणी विशेष करून शेतकरीवर्गाकडून होत आहे.
"भूमिअभिलेख विभागाशिवाय इतरही विभागातील लाचखोरीच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी कराव्यात. याशिवाय १०६४ हा टोल फ्री क्रमांकही चोवीस तास सेवेसाठी तत्पर ठेवण्यात आला आहे."
- शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग