Antinarcotics Drugs Code : अंमली तस्करांविरोधात शहरात ‘ॲन्टिनार्कोटिक्स ड्रग्ज्‌ स्कॉड’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Police Commissioner Ankush Shinde vs Drugs

Antinarcotics Drugs Code : अंमली तस्करांविरोधात शहरात ‘ॲन्टिनार्कोटिक्स ड्रग्ज्‌ स्कॉड’!

नाशिक : शहरात अंमली पदार्थांची सर्रासपणे होणाऱ्या विक्री व तस्करीची समस्या गंभीर स्वरूपाची आहे. हॉटेलमध्ये प्रतिबंधित फ्लेवरचा वापर करून हुक्का पार्लर चालविले जात आहेत. गांजा, अफूची खुलेआम विक्री होत असताना त्याविरोधात पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. याबाबत ‘सकाळ’मधून ‘नशेचा बाजार’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली होती.

याची गांभीर्याने दखल नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली असून, शहरातील अंमली पदार्थांचे रॅकेट उदध्वस्त करण्यासाठी विशेष ‘ॲन्टिनार्कोटिक्स ड्रग्ज्‌ स्कॉड’ (अंमली पदार्थाविरोधी पथक) तयार करण्यात आले आहे. दरम्यान, याचप्रकरणी नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये नाशिकमधील अंमली पदार्थांमुळे तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याबाबत चिंता व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी विशेष कारवाई करीत अंमली पदार्थांचे रॅकेट उदध्वस्त करण्याची मागणी केली आहे. (Antinarcotics Drugs Code in city against drug traffickers by nashik police commissioner ankush shinde nashik news)

‘सकाळ’मध्ये २९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्‌ध झालेले वृत्त

‘सकाळ’मध्ये २९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्‌ध झालेले वृत्त

शहरात काही वर्षांमध्ये अंमली पदार्थांची तस्करीची समस्या निर्माण झाली आहे. गांजा, अफू, प्रतिबंधित तंबाखू यांची तस्करी व विक्री शहरात खुलेआम होते. तर, एमडी ड्रग्ज्‌ही शहरातील काही भागात चोरीछुप्यारीतीने सर्रास विकले जाते. दरम्यान, गेल्या आठवड्यात नाशिक आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारणारे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची अंमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीबाबतच्या या समस्येची गांभीर्याने दखल घेतली.

त्यानुसार, त्यांनी शहरातील अंमली पदार्थाचे तस्करी व विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उदध्वस्त करण्यासाठी विशेष पथक ‘ॲन्टिनार्कोटिक्स ड्रग्ज्‌ स्कॉड’ची निर्मिती केली आहे. या विशेष पथकामार्फत शहरातील अंमली पदार्थाच्या रॅकेटची पाळेमुळे नष्ट करण्यात येणार आहे.

आमदार फरांदे यांची लक्षवेधी

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (ता. २२) आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील अंमली पदार्थांच्या तस्करीबाबतचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहाचे लक्षवेधीतून लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, की शहरातील खुलेआम अंमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. शालेय विद्यार्थ्यांकडे अंमली पदार्थ आढळून येत आहेत. तस्करांचे प्रमाण वाढले असून, याबाबत गृहमंत्र्यांनी गांभीर्याने निर्णय घेऊन अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे पाळेमुळे नष्ट करावीत, अशी मागणी केली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

असे असेल ॲन्टिड्रग्ज स्कॉड

आयुक्तांच्या सूचनेनुसार निर्माण करण्यात आलेले ‘ॲन्टिनार्कोटिक्स ड्रग्ज्‌ स्कॉड’ हे शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहील. या स्कॉडमध्ये एक पोलिस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि १५ पोलिस अंमलदार असणार आहेत. यांसह या स्कॉडसाठी विशेष वाहनांसह अनेक तांत्रिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, नवीन वर्षांपासून या स्कॉडच्या कामकाजाला सुरवात होणार आहे.

‘सकाळ’ने फोडली होती वाचा

नाशिक शहर-जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी, खुलेआम विक्री, तरुणाईला विळखा याबाबतची सविस्तर वृत्त मालिका ‘नशेचा बाजार’ ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाली होती. नाशिकच्या प्रवेशद्वारातूनच मादक द्रव्यांची ‘एन्ट्री’ या वृत्ताने शहर आणि पोलिस दलात खळबळ उडाली होती. या मालिकेमुळे खडबडून जाग आलेल्या शहर पोलिसांनी शहरातील हॉटेल, गंगाघाट, पंचवटी परिसरात छापासत्र सुरू केले. त्यातून नशेबाजांविरोधात गुन्हे दाखल करीत कारवाई केली होती.

"‘ॲन्टिनार्कोटिक्स ड्रग्ज्‌ स्कॉड’च्या माध्यमातून शहरातील अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अंमली पदार्थ घातक आहेत. त्याचा नायनाट पोलिस वेळीच करतील." - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.