
Nashik Crime News: गहू काढणीच्या मशीनवरुन वाद, दोघांच्या मारहाणीत 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू
सिन्नर : शेतातील गहू काढण्यासाठी कोणाच्या शेतात अगोदर यंत्र न्यायचे या वादातून खंबाळे सिन्नर येथे बुधवारी (ता. 15) सायंकाळी 35 वर्षीय तरुणाला दोघांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.
लाथा बुक्क्यांनी केलेली मारहाण त्रासदायक ठरल्याने सदर तरुणास सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तेथे रात्री दहा वाजेच्या उपचारादरम्यान सुमारास त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, वावी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघा संशयितांचा रात्रभर शोध घेतला. मात्र ते पसार झाले होते.
हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
अंकुश यादव आंधळे असे या मारहाणीत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पावसाचे वातावरण असल्याने शेतात उभा असलेला गहू सोंगण्यासाठी सर्वत्र शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. गहू काढणीसाठी आलेले यंत्र अगोदर कोणाच्या शेतात न्यायचे यावरून खंबाळे येथे अंकुश आंधळे व संशयित दोघे यांच्यात भांडण झाले.
त्यातून अंकुश याला दोघांनी बेदम मारहाण केली. रात्री छातीत दुखू लागल्याने अंकुशला सिन्नर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर अंकुश याचे कुटुंबीयांनी वावी पोलीस ठाण्यात येऊन अंकुशला मारहाण करणाऱ्या दोघांच्या विरोधात बुधवारी रात्री मारहाणीची तक्रार दिली होती.
ते तक्रार देऊन खंबाळे गावाकडे परत जात असतानाच अंकुशचा दवाखान्यात मृत्यू झाल्याचा निरोप आला. याबाबत समजल्यावर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज लोखंडे यांनी तातडीने संशयीतांच्या शोधासाठी खंबाळे येथे पथक रवाना केले. मात्र, दोघा संशयितांनी पोलीस येण्यापूर्वीच गुंगारा दिला होता. रात्रभर पोलीस या दोघांचा परिसरात शोध घेत होते.