
Tukaram Munde : तुकाराम मुंडे आल्याने पशुसंवर्धनचे धाबे दणाणले!
Tukaram Munde : धडाडीच्या निर्णयासाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंडे यांची पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागात सचिवपदी बदली होताच, या विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पशुसंवर्धन दवाखान्यात हजेरी लावत गायब होणाऱ्या कर्मचारी यांना आता दवाखान्यात जावे लागेल, अशी प्रतिक्रिया दिली. यातच ऐन अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्यांचे दिवस असताना मुंडे रुजू झाल्याने अधिकारी, कर्मचारी यांना घाम फुटला आहे. (arrival of Tukaram Munde shook animal husbandry department nashik news)
शिस्तप्रिय तुकाराम मुंडे यांनी आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारताच त्यांनी आरोग्य विभाग पळविला होता. मुंडे यांनी जिल्हा परिषदेसह ग्रामीण रुग्णालयांना अचानक भेटी देण्याचे फर्मान काढले होते. त्यानुसार, अचानक भेटी देऊन अधिकारी वर्गाकडून झाडाझडती झाल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली होती.
मुंडे यांनी थेट व्हाटसअॅपवर, आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधत, आढावा घेत असल्याने अधिकारी जर्जर झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे दिसून आले होते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मात्र, मुंडे यांची आरोग्यातून उचलबांगडी झाली. उचलबांगडी झाल्यानंतर, काही महिन्यांपासून ते नियुक्तींच्या प्रतिक्षेत होते. अखेर मंगळवारी (ता.२) मुंडे यांची पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली.
मुंडे या विभागात आले म्हणून, या विभागातील कर्मचारी वर्गाची लागलीच धावपळ सुरू झाल्याचे दिसून आले. तसा पशुसंवर्धन विभाग दुर्लक्षित असा आहे. रिक्त जागांचे प्रमाण अधिक असल्याने पशुसंवर्धन दवाखान्यांमधील अनेक पदे रिक्त आहेत.
एकाच अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे अनेक दवाखान्याचा पदभार आहे. मात्र, अनेक कर्मचारी दवाखान्यात केवळ कागदोपत्री दिसतात. प्रत्यक्षात दवाखान्यात कमी अन इकडेतिकडे जास्त फिरताना दिसत असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले.