
Nashik News: ओळख विसरलेल्या बाबांना अष्टविनायकच्या कार्यकर्त्यांनी पोचवले सुखरूप घरी
इंदिरानगर : वयोमानानुसार प्रासंगिक स्मृतिभ्रंश समस्या असलेल्या सिडकोमधील विक्रम पाटील या ज्येष्ठांना राजीवनगर येथील अष्टविनायक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाच तास इंदिरानगर आणि सिडको भागात फिरवत कुटुंबीयांकडे सोपवल्याने सकाळपासून हवालदिल झालेल्या पाटील कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
इंदिरानगरच्या वडाळा पाथर्डी रस्त्यावर शिवसेना (ठाकरे गट) माजी महापौर देवानंद बिरारी आणि विभागप्रमुख बंडू दळवी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ श्री. पाटील येऊन बसले. कदाचित उन्हामुळे बसले असतील म्हणून येथील महेश चव्हाण, कौस्तुभ दळवी, सागर जोशी, सुधीर महाले, अमोल चांदगुडे आणि शेखर मगर यांनी विचारपूस केली. त्यांना पाणी पिण्यासाठी दिले. मात्र हे बाबा गोंधळल्यासारखे वाटल्याने त्यांना या युवकांनी नावाने पत्ता विचारला असता त्यांनी नाव सांगितले.
मात्र, पत्ता सांगता आला नाही. मुलाचे नाव प्रकाश आहे आणि स्वामी समर्थ केंद्र एवढे ते फक्त सांगू शकले. मग उपरोक्त सर्व युवकांनी त्यांना चारचाकीत घेतले. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल एस. एम. चौधरी हेदेखील त्यांच्यासोबत निघाले. चेतनानगर, प्रशांतनगर, गणेश चौक, दत्त चौक, पवननगर येथील स्वामी समर्थ केंद्र परिसरात नेले.
तेथील रहिवाशांना विचारपूस केली. मात्र, श्री. पाटील यांना कुणीही ओळखत नव्हते. अजून केंद्रांचा शोध घेत असताना उत्तमनगर येथील महाविद्यालयाजवळ असलेल्या स्वामी समर्थ केंद्राजवळ ते आले. या भागातील एक बाबा सकाळपासून हरवले असल्याचे त्यांना कळले आणि मग या युवकांनी तिथेच शोध घेत श्री. पाटील यांचे घर शोधून काढले.
त्यांना बघताच घरी असलेल्या त्यांच्या सून आणि नातवाने त्यांना आलिंगन दिले. सकाळपासून इतर सर्व कुटुंबीय त्यांना सर्वत्र शोधत होते. मात्र, साडेचारच्या सुमारास या युवकांनी त्यांना घरी पोचते केल्याने सर्व कुटुंब आनंदले. या पाच तासात या युवकांनीच श्री. पाटील यांना चहा, नाश्ता आदी बाबी दिल्याने कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.