
Bribe News: 4 हजाराची लाच घेताना सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यास अटक
सोग्रस : जनावरांच्या गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात चार हजारांची लाच स्वीकारताना चांदवड पंचायत समितीतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नारायण विश्वनाथ शिंदे (वय ४२) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.
तक्रारदाराच्या वडिलांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठ्यासाठी अनुदान प्रकरण मंजूर करून देण्याच्या बदल्यात पंचायत समितीतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नारायण शिंदे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
शुक्रवारी (ता. १७) पंचायत समिती कार्यालयात चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. या संप काळात बहुतांशी कर्मचारी कामावर नसताना नारायण शिंदे त्यास अपवाद ठरले.