Nashik Crime News : फुलेनगरमध्ये गोळीबार टोळक्याचा धुडघुस; पंचवटीत उशिरा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : फुलेनगरमध्ये गोळीबार टोळक्याचा धुडघुस; पंचवटीत उशिरा गुन्हा दाखल

नाशिक : पंंचवटीतील फुलेनगर येथील मुंजोबा चौकात काही अज्ञात आठ ते दहा हल्लेखोरांनी शनिवारी (ता 11) रात्री काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हातात कोयते आणि गावठी कट्टे घेत एका युवकावर हल्ला (Attack) केला.

मात्र, घटनास्थळावरून युवकाने पळ काढला. (attackers attacked youth with knives and Gavthi katte from dispute nashik crime news)

यावेळी संतप्त हल्लेखोरांनी गावठी कट्यातून गोळीबार केला. विशेषतः हल्लेखोरांवर कुत्रा भुंकल्याने त्यांनी त्याचावरही गोळी झाडली. यात कुत्रा जखमी असून, एक महिलाही या प्रकरणात जखमी झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठरोड वरील फुलेनगर भागातील मुंजोबा चौक येथे शनिवार रोजी रात्री आठ ते दहा हल्लेखोरांनी विशाल संजय महाले या युवकावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या तावडीतून सुटून विशाल याने पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, याचा जाब विचारणाऱ्या विशालच्या आई उषा संजय महाले यांच्यावर संशयितांनी थेट गावठी कट्ट्यातून फायर केल्याने बोलले जाते. त्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संशयकांनी घटनास्थळावरून पळ काढत असताना त्यांच्या मागावर काही जमाव लागला त्यावेळी त्यांच्यावर भुंकणाऱ्या श्वानावर गोळी मारत जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धाव घेत संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

आधी नकार, नंतर गुन्हा दाखल

गोळीबाराची गंभीर घटना घडलेली असताना पंचवटी पोलीस गोळीबार झालाच नसल्याचे सुरुवातीला सांगत होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास परिसरातील गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज माध्यम प्रतिनिधींच्या हाती लागताच पोलिसांची झोप उडाली. यानंतर गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पंचवटीत दहशतीचे वातावरण

होळीच्या दिवशी थेट भररस्त्यात फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करून एका युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील मुख्य संशयित फरार असल्याची परिसरात चर्चा असतानाच पुन्हा एकदा पंंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.