
Nashik News : बिबट्यांना बंद खोलीत जेरबंद करण्याचा प्रयत्न; मिरगाव परिसरात बछड्यांसह मादीचा वावर
सिन्नर (जि. नाशिक) : मिरगाव (ता. सिन्नर) शिवारात मिरगाव- सायाळे रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून मादीसह तीन बछड्यांनी दहशत निर्माण केली आहे. बुधवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास मिरगाव शिवारात एका निर्जन वस्तीवर त्यांनी ठाण मांडल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले.
मादीसह बछडे बंद खोलीत गेल्याचे बघताच शेतकऱ्यांनी त्यांना खोलीतच कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मादी व तीन बचड्यांनी तेथून धूम ठोकली.
मिरगाव- सायाळे रस्त्यावर वावी येथील व्यावसायिक श्यामलाल जाजू यांची वस्ती आहे. श्री. जाजू हे वावी येथे वास्तव्यास असल्याने वस्तीवर कोणी राहात नाही. तेथील एका खोलीत मादी बिबट्यासह तीन बछडे असल्याचे समजताच तेथील शेतकऱ्यांनी याबाबत परिसरात सर्वांना ही माहिती दिली.
त्यानंतर वनविभाग व वावी पोलिसांनाही दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले. घटनास्थळी जेसीबी बोलावून जेसीबी व पंजाच्या साह्याने दरवाजा बंद करण्यात आला. परंतु, तत्पूर्वीच मादी बिबट्यासह बछड्यांनी तेथून पलायन केले होते.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी जमली होती. बॅटरी लावून पाहिल्यानंतर खोलीत काहीच दिसून आले नाही. दरम्यान, दोन दिवसांपासून या परिसरात मादी बिबट्यासह तीन बछडे मुक्तपणे संचार करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याच परिसरातील साहेबराव गोरडे यांच्या वस्तीवर बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.