
Nashik News : बागलाण तालुका वंचित बहुजन आघाडीची बैठक; आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार
सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर व पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळात कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले. (Baglan Taluka Vanchit Bahujan Aghadi meeting Determined to fightupcoming elections on their own Nashik News)
येथील शासकीय विश्रामगृहावर ही बैठक घेण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष शेखर बच्छाव यांनी केले. महासचिव दादासाहेब खरे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी बागलाण तालुक्यातील पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागेवर विजय संपादन करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले.
जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्छाव, गोरख चव्हाण, जिल्हा संघटक विकास देवरे, कृष्णा तलवारे, दीपक बच्छाव, तालुका उपाध्यक्ष नीलेश देवरे आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यानंतर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी आदिवासी, मातंग, भिल्ल आदी समाजाच्या व विविध संघटनेत काम करणाऱ्या बहुजन समाजातील प्रभावी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने या कार्यकर्त्यांचा तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, महासचिव दादासाहेब खरे, तालुका उपाध्यक्ष नीलेश देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
या वेळी तालुका कार्यकारिणीच्या विस्ताराच्या दृष्टीने आणि पक्षबांधणी करण्यासाठी काही महत्त्वाच्या पदांवर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. मुल्हेर परिसरातील आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केले असून, लवकरच या परिसरात वंचित बहुजन आघाडीची शाखा बांधणी करून पुढील निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत कडू वणीस, डॉ. सिद्धार्थ जगताप, जितेंद्र सरदार, प्रकाश दाणी, लाला खरे, दीपक पाटील, आरिफ खाटीक, भाऊराव पाटोळे, बंटी काकळीज या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुक्याच्या विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका महासचिव दादा खरे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील जगताप यांनी आभार मानले.