esakal | ऑक्सिजन देणाऱ्या वटवृक्षाशी कसली दुश्मनी? हायवेवर मध्यरात्रीचा खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

banyan tree

ऑक्सिजन देणाऱ्या वटवृक्षाशी कसली दुश्मनी? हायवेवर मध्यरात्रीचा खेळ

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी (नाशिक) : वटवृक्ष अत्यंत औषधी असून एक गुणकारी वृक्ष म्हणून ओळखला जातो. आधुनिकीकरणाच्या ओघात कॉंक्रिटीकरण होत असल्याने या वृक्षाचे अस्तित्व जवळपास धोक्यात आले आहे. याचाच प्रत्यय देणारी एक संतापजनक घटना राज्य महामार्गावर घडली.

ऑक्सिजन देणाऱ्या वटवृक्षाशी कसली दुश्मनी? हायवेवर मध्यरात्रीचा खेळ

राज्य महामार्ग क्रमांक ३७ वाडीवऱ्हे ते साकूर फाटा पागेरे वस्ती जवळ जुनाट डेरेदार वडाची वृक्ष पेटवून देण्याची घटना बुधवार ( ता. १४) मध्यरात्री घडली. मोठा डेरेदार वटवृक्ष जळून महामार्गावर पडल्याने काहीकाळ येथील वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच शाखा अभियंता श्रेणी १ चे योगेश गोडसे यांनी मध्यरात्री पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणत जेसीबीच्या साहाय्याने वटवृक्ष महामार्गाच्या बाजूला सारत महामार्गावरील कोंडी सुरळीत केली.

समाजकंटकांकडून प्रकार

याबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात सहाय्यक अभियंता श्रेणी १ चे कौस्तुभ पवार यांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-नाशिक महामार्गाला पर्यायी व्यवस्था म्हणून राज्य महामार्ग ३७ वरून वाहतूक वळविण्यात येत आहेत. मात्र, काही समाजकंटकांनी मागीलवर्षी प्रमाणे याही वर्षी डेरेदार वृक्षांची कत्तल कारणेकामी चार वटवृक्षांना मध्यरात्रीच्या दरम्यान आग लावून पोबारा केला. आगीचे लोळ प्रचंड प्रमाणात परिसरात पसरताच स्थानिक शेतकरी यांनी घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग श्रेणी १ यांना देत सहकार्य मागितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाखा अभियंता योगेश गोडसे यांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिकांना सोबत घेऊन पोलिसांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महामार्गावर पडलेल्या वृक्षांना जेसीबीच्या साहाय्याने बाजूला सारून वाहतूक कोंडी खुली केली. विशेष म्हणजे मागीलवर्षीदेखील याच परिसरात डेरेदार वटवृक्ष पेटवण्यासाठीचा प्रयत्न समाजकंटकांनी केला गेला होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.