Nashik News : ग्रामीण भागातही आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

biometric

Nashik News : ग्रामीण भागातही आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

नाशिक : अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती प्रकरणानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहात नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मुख्यालयातही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत अधिकारी-कर्मचारी नसल्याच्या तक्रारी वाढल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

बायोमेट्रिक हजेरी, तसेच फोटो अपडेशन आणि अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करुन लाइव्ह लोकेशन यंत्रणेचाही वापर केला जाणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी सोमवारी (ता. ६) विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. आरोग्य सेवा विभागाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याप्रमाणेच मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना अचानक भेटी देण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले होते.

त्यानुसार मित्तल यांनी राजापूर, नांदुर्डी आरोग्य केंद्रांना भेटीदेखील दिल्या. त्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून भेटी देणे अपेक्षित होते. परंतु या भेटी झाल्या नाहीत. याचदरम्यान अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी गैरहजर असल्याचे अन्‌ यात एका महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार उघडीस आला. त्यावर मित्तल यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आपापल्या कार्यस्थळावर उपस्थित राहण्यासाठी ग्रामीण भागातही अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार आहे. तसेच, फोटो अपडेशन आणि अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून लाइव्ह लोकेशन यंत्रणेचाही वापर केला जाणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

त्यामुळे सर्वच कर्मचारी कार्यस्थळी आणि पूर्ण वेळ आहेत की नाही, याबाबत देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. यामुळे मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

अचानक देणार भेटी

जिल्ह्यात आरोग्य विभागासह सर्वच विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी पुन्हा एकदा ‘अचानक भेटी’ देऊन तपासणी केली जाणार आहे. यात अधिकारी, कर्मचारी गैरहजर, अनुपस्थित आढळून आल्यास त्यांच्यावर निलंबनासह फौजदारी व सर्वच प्रकारच्या कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशाराही मित्तल यांनी दिला.

टॅग्स :NashikZPAttendance