पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्र्यांना साकडे | Petrol Diesel | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Price
पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी भाजपचे साकडे

पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्र्यांना साकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव - केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलवरील एक्साइज कर पाच रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवरील एक्साइज कर दहा रुपये प्रतिलिटर कमी करून जनतेला दिलासा दिला. केंद्र सरकारने करकपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम लक्षात घेता राज्यात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले. राज्य शासनानेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. १२) तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले. निवेदनात केंद्र सरकारने इंधन दर कमी करून जनतेला दिलासा दिला. त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून इंधनदर कमी करावेत.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने इंधन दरवाढीविरोधात आंदोलने केली होती. केंद्राने दर कमी केल्याने राज्याकडूनही जनतेच्या स्वाभाविक अपेक्षा आहेत. आघाडी सरकार मात्र त्यासाठी टाळाटाळ करीत आहे. यामुळे इंधन दरवाढीविरोधात आघाडीतील घटक पक्षांनी केलेली आंदोलने म्हणजे राजकीय मतलबीपणा होता, असा आरोप श्री. निकम यांनी केला.

हेही वाचा: मालेगावात बंदला गालबोट; बंद दरम्यान पोलिस व दुकानांवर दगडफेक

राज्यात डिझेलवर २४, तर पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. त्याखेरीज पेट्रोलवर प्रतिलिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलिटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलवर करापोटी ३० ते ४० रुपये प्रतिलिटर मिळतात. राज्याने करात कपात करावी.

दुष्काळी स्थिती नसल्याने प्रतिलिटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिष्टमंडळात मुकेश झुनझुनवाला, भरत पोफळे, देवा पाटील, हरिप्रसाद गुप्ता, पोपट लोंढे, संजय काळे, विजय देवरे, योगेश पाथरे, स्वप्नील भदाणे, पप्पू पाटील, सुनील शेलार, राहुल पाटील, श्याम गांगुर्डे, कुणाल सूर्यवंशी, शक्ती सोदे, प्रकाश मुळे, कमलेश सोनवणे, संजय निकम, हरीश इंदोरकर, नाना मराठे आदींचा समावेश होता.

loading image
go to top