
Chitra Wagh: चित्रा वाघ यांनी केला एसटीतून सवलतीत प्रवास; फडणवीसांचे मानले आभार
नाशिक : भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नुकताच एसटीतून प्रवास केला. विशेष म्हणजे महिलांसाठी एसटीमध्ये असलेल्या ५० टक्के सवलतीचा लाभही त्यांनी घेतला. तसेच या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले आहेत. वाघ यांनी या प्रवासाचे फोटोही सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. (BJP Chitra Wagh travels through ST Bus and given thanks to Devendra Fadnavis)
आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, "फक्त बोलणारे नाही तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. श्रींच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र लालपरीच्या प्रवसात माऊलींना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री फडणवीसांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली.
आज सकाळी नाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह ST ने प्रवास सुरू केला. तिकिटावरती सवलतीची रक्कम पाहून खात्रीच पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली. या सवलतीमुळं होणारा फायदा सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या 'लालपरी सशक्त नारी' योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मातृशक्ती तर्फे आभार, असंही यामध्ये चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्पात झाली होती घोषणा
दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी बसमधून महिलांना सरसकट तिकीटात ५० टक्के सवलत जाहीर केली होती. त्याची अंमलबजावणी कालपासून सुरु झाली, त्यानंतर अनेक राज्यातील अनेक महिलांनी या सवलतीचा फायदा घेतला आहे.