
Nashik News : निधीचा खेळ अन् शिवसृष्टीच्या कामाला Break! देखण्या कामाला सत्तांतराचे विघ्न
येवला (जि. नाशिक) : उत्सवप्रिय आणि ऐतिहासिक वलय लाभलेल्या तात्या टोपेंच्या पैठणीच्या या गावात शिवसृष्टी साकारावी, ही येवलेकरांची कित्येक वर्षांची इच्छा..! ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपले वजन वापरून ही इच्छापूर्ती केली.
मात्र राज्यात शिंदे-ठाकरे वादात सत्तांतर झाले आणि मतदारसंघाचे मंत्रिपद गेले. त्यानंतर शिवसृष्टीच्या निधीला ‘ब्रेक’ लागल्याने काम रखडले असून, येवलेकरांना पुन्हा एकदा प्रतीक्षेची वेळ येत आहे. (Break to work of Shiv Srishti at yeola Nashik News)
छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख सांगणारी, त्यांच्या कार्यकर्तृत्वासह त्यांच्या मावळ्यांचा परिचय देणारी ही चित्ररूपी शिवसृष्टी येवल्याची नवी ओळख तयार करणार आहे. पैठणीचे गाव, तात्या टोपेंची जन्मभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा यामुळे राज्यभर नावलौकिक असलेल्या येवल्याच्या वैभवात या मॉडेल ठरेल अशा शिवसृष्टीमुळे भर पडणार आहे.
या देखण्या शिवसृष्टीचे एप्रिलमध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी शिवसृष्टीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी भरसभेत ग्वाही दिली होती, तर भुजबळांनीही माझ्यासाठी आगळीवेगळी शिवसृष्टी होईल असे जाहीर केले होते.
मात्र, त्यानंतर दोन-अडीच महिन्यांतच सत्तांतराचे वादळ उठले आणि शिवसृष्टीच्या मंजूर निधीलाही राजकीय कुरघोडीत ब्रेक लागला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
विंचूर चौफुलीलगत जुन्या पंचायत समितीसुमारे दोन एकर जागेत या शिवसृष्टी प्रकल्पाचे भव्यदिव्य काम साकारले जाणार आहे. यात सुशोभीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणविषयक अभ्यास, सुसाध्यता, संशोधनात्मक अभ्यास आदी बाबींचा विचार करून शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे.
येथे शिवाजी महाराजांचा ब्राँझ धातूचा सिंहासनाधिष्टीत मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टीसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून दोन कोटी, तर प्रादेशिक पर्यटन योजनेतून चार कोटी अशा सहा कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.
भुजबळ पालकमंत्री असताना या कामासाठी निधीही मंजूर आहे. मात्र त्या काळातील मंजूर कामांना सध्या स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी व शिवसृष्टीच्या कामाला चालना द्यावी अशी मागणी स्वतः भुजबळ यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.
ही कामे अर्धवट असल्याने निविदा प्रक्रिया राबवून हा निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या ठिकाणी अजूनही अनेक कामे बाकी असल्याने त्यासाठी निधीचा पाठपुरावा देखील भुजबळांकडून सुरूच आहे.
■ सत्ता बदलली, माशी शिंकली!
भुजबळांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर निधीतून येथे सपाटीकरणासह तीनही बाजूला भव्यदिव्य उंच भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर पर्यटन विभागाकडून मिळणाऱ्या निधीत उर्वरित कामे होणार आहेत. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि येथील आमदार तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याही मंत्रिपदाला खो लागला .त्यातच नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने निविदा प्रक्रिया बाकी असलेल्या कामाना स्थगिती दिली असल्याने साहजिकच येणारा निधी रखडला असून, शिवसृष्टीच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे देखणी शिवसृष्टी पाहण्याचे येवलेकरांचे भाग्य लांबणीवर पडले हे निश्चित!
■अशी साकारेल शिवसृष्टी
√ छत्रपती शिवाजी महाराजाचा ब्रॉँझ धातुचा सिंहासनाधिष्ठीत पूर्णाकृती पुतळा
√ शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडींचे कोरीव कामाचे चित्रशिल्प
√ शिवसृष्टी परिसरात पुतळ्यासाठी चौथरा, किल्ले स्वरुपाचे प्रवेशद्वार
√ परिसरात उद्यान, टप्पे स्वरुपातील कारंजे व सुशोभीकरण करणे
√ स्वच्छतागृह, उपाहारगृह, भांडार कक्ष
√ परिसरात अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण
√ पाणीपुरवठा व मलनि:सारण करणे
√ संरक्षक भिंत उभारणे, चौकीदार कक्ष बांधणी करणे, वाहनतळासाठी काँक्रिटीकरण