Nashik Crime News : वावी येथे घरफोडी; माजी सैनिकाच्या घरात रोख रक्कमेची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theft

Nashik Crime News : वावी येथे घरफोडी; माजी सैनिकाच्या घरात रोख रक्कमेची चोरी

सिन्नर : वावी (ता. सिन्नर) येथे शनिवारी (ता. २५) मध्यरात्री चोरट्यांनी शिर्डी महामार्गावरील खासगी शॉपिंग सेंटरमधील दोन दुकानांची कुलपे तोडून बॅटरी संच व विद्युत मोटारी चोरून नेल्या. तसेच, निंबोणीचा मळा परिसरात माजी सैनिकाच्या घरातून ३२ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली. एकाच रात्री झालेल्या चोरीच्या या घटनांमध्ये रोख रकमेसह सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

वावी येथील गणपती मंदिरासमोर अर्जुन आबाजी काटे यांच्या जागेतील खासगी शॉपिंग सेंटरमध्ये योगेश पाचोरे यांचे बॅटरी, इन्वर्टर विक्री व दुरुस्तीचे व संजय यादव (रा. राहता) यांचे विद्युत पंप विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. या दोन्ही दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी जुन्या व दुरुस्तीला आलेल्या बॅटऱ्या, इन्व्हर्टर व वीज पंप चोरून नेले.

पहाटे साडेपाचच्या सुमारास पप्पू काटे यांना हा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी वीज पुरवठा करणाऱ्या मीटरच्या वायर तोडून टाकल्या, बॅटरीच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरादेखील काढून नेला. यात, सुमारे दोन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे पाचोरे यांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. विशेष म्हणजे, दोनही दुकानांतील नव्या बॅटऱ्या व विद्युत पंप जैसे थे असल्याने स्क्रॅप व्यवसायाशी संबंधितांनीच ही चोरी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शहा रस्त्यावरील निंबोणीचा मळा येथे माजी सैनिक सुधाकर ताजणे यांची वस्ती आहे. त्यांचा मुलगा केशव याचे वावी येथे महाराष्ट्र बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आहे. केशवने ग्राहकांना देण्यासाठी काढलेले बत्तीस हजार रुपये पॅन्टच्या खिशात ठेवलेले होते.

रात्री बारा ते दोनच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत पॅन्टच्या खिशातील बत्तीस हजार रुपये रोख व दुकानाच्या दोन चाव्या घेऊन चोरटे पसार झाले. जाताना त्यांनी पॅन्ट अंगणात उभ्या ट्रॅक्टरवर टाकून दिली. याशिवाय खळवाडी परिसरात विलास मंडलिक यांच्या वस्तीवरदेखील एका घरातून महिलेच्या कापडी पिशवीत असलेले पाचशे रुपये घेऊन चोरटे पसार झाले.

ग्रामरक्षक दलाची गरज
गेल्या वर्षभरात वावी गावात जबरी चोरीच्या अनेक घटना घडल्या. मात्र, यातील एकाही घटनेचा अद्याप छडा लागलेला नाही. रात्रीच्या वेळी गावात एक गुराखी गस्त घालतो. त्याला स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांकडून पुरेशा प्रमाणात मानधन दिले जात नसल्याची ओरड आहे.

त्यामुळे काही भागात हा गुराखी गस्त घालत नाही. नव्याने पदभार घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी गावात सतर्क राहण्यासाठी ग्रामरक्षक दल पुन्हा कार्यान्वित करण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :NashikCrime News