
Nashik Crime : शहरासह परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. पोलिसांनी या तिघा संशयितांकडून दोन लाख ३३ हजार रुपये किमतीचे घरफोडीतील १४ मोबाईल जप्त करण्यात आले.
पवारवाडी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच दुचाकी चोरांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून दोन लाख ८० हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या.
जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Burglary two wheeler thieves on prow 14 mobiles 11 two wheelers seized Nashik Crime)
वडनेर खाकुर्डी कार्यक्षेत्रातील अजंग वडेल परिसरात दोन आठवड्यापूर्वी चोऱ्या, घरफोड्यांचा सुळसुळाट झाला होता. चोरट्यांनी सेतू सेवा केंद्र, कुलस्वामिनी मोबाईल सेंटर, कृषी सेवा केंद्रात घरफोडी केली होती.
सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले होते. मात्र त्यांना पकडण्यात यश येत नव्हते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व सहकाऱ्यांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती काढून व वेगाने तपास चक्रे फिरवीत शेख साहील खालीक (रा. पवननगर, धुळे) याला अटक केली.
त्याची कसून चौकशी केली असता चम्पिनसिंग मिलनसिंग व अरबाज मुक्तार कुरेशी (दोघे रा. मोहाडी, धुळे) यांच्या मदतीने घरफोड्या केल्याचे सांगितले. विशेष पथक व गुन्हे पथकाने तिघा संशयितांना अटक करुन त्यांच्या जवळून १४ मोबाईल जप्त केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पवारवाडी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिस निरीक्षक सुजित पाटील, उपनिरीक्षक विनोद परदेशी व सहकाऱ्यांनी पाच दुचाकी चोरट्यांना पकडून त्यांच्याजवळून दोन लाख ८० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या ११ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संशयितांविरुद्ध वडनेर खाकुर्डी व पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चौकशीनंतर संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.