Nashik News: चांदेश्‍वरी घाटात बस फेल, 2 तास प्रवासी ताटकळत | Bus fails at Chandeshwari Ghat passengers stranded for 2 hours Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

msrtc bus file photo

Nashik News: चांदेश्‍वरी घाटात बस फेल, 2 तास प्रवासी ताटकळत

Nashik News : नांदगाव आगारातील बस बंद पडल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना ऐन उन्हात ताटकळत बसण्याची वेळ आली. नांदगाव आगाराची बस या नेहमीच रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवासी वेळेवर आपल्या ठिकाणी पोचतील याबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे. (Bus fails at Chandeshwari Ghat passengers stranded for 2 hours Nashik News)

काही दिवसांपूर्वी नांदगाव आगाराची बस ही वऱ्हाडी मंडळींना घेऊन जात असताना रस्त्यात बंद पडली होती. यामुळे विवाह तब्बल तीन तास उशिराने लागला होता. या घटनेनंतर नांदगाव आगारातील बसमध्ये सुधारणा झाली नसल्याचे पुन्हा बस बंद पडल्याने अधोरेखित झाले आहे.

नांदगाव आगारातून एम.एच १२ ईएफ ही बस प्रवाशांना घेऊन कन्नडकडे निघाली. बस १६ किलोमीटर अंतर कापून कासारी जवळील चांदेश्‍वरी घाटाता आली असता बस एका वळणावर बंद पडली.

अनेक प्रयत्न करूनही बंद चालू होत नसल्याने चालकाने समयसूचकता दाखवीत बस सुरक्षितरित्या रस्त्याच्या कडेला लावली. यावेळी प्रवाशांनी देखील यासाठी हातभार लावत घाटातून बस चाकांना ओटी लावून बस थांबविली.

यानंतर आगारात संपर्क साधल्यानंतर तब्बल दोन तासांनी पर्यायी बस आली व प्रवाशांना घेऊन गेली. मात्र या सर्व प्रकाराचा बसमधील विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत दोन तास उन्हामध्ये ताटकळत बसण्याची वेळ आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बस रस्त्यावर कशी संतप्त प्रवाशांचा सवाल

बसमधील प्रवासी यांनी बसचे कागदपत्र तपासले असता ही बस १४ वर्ष २ महिने जुनी असल्याचे कळाले. यातच बसचा विमा देखील २०२२ मध्ये संपलेला होता. बसचे पीयूसी प्रमाणपत्र देखील संपलेले होते. त्यामुळे अशी बस रस्त्यावर कशी ? असा सवाल संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला.

नांदगाव बस आगारात ४७ बस आहेत, या सर्व बस दहा ते चौदा वर्ष जुन्या आहेत. प्रवासापूर्वी बसची तपासणी केली जाते. मात्र ते मशिन असल्याने केव्हाही बंद पडू शकते. आगारातर्फे नवीन बसची मागणी केलेली आहे. तसेच आगरात लवकरच नवीन १७ इलेक्ट्रीक बसेस देखील दाखल होतील. मात्र तोपर्यंत पर्याय म्हणून या बसेसचा वापर करावा लागत आहे.

- विश्‍वास गावित, आगार व्यवस्थापक, नांदगाव

टॅग्स :NashikMSRTC