
Nashik Cyber Crime : सावधान! अनोळखी व्हिडिओ कॉल टाळा; अन्यथा...
Nashik News : दिवसागणिक तंत्रज्ञान विकसित होत असताना, त्याचा वापरही वाढतो आहे. स्मार्ट फोनचेही तसेच झाले आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध झाल्याने जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील व्यक्तीशी थेट संपर्क होतो. (by online video calls of unknown person blackmailing cyber crime nashik news)
परंतु अलीकडे या सुविधेचा गैरवापर सायबर भामट्यांकडून होतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हिडिओ कॉलिंगच फिचर वापरताना अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल टाळलेलाच बरा. अन्यथा ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्मार्ट फोनमुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सोशल मीडियाचे विविध फिचर आकर्षित करतात. परंतु या फिचर वापर करीत असताना त्यातील धोक्यांची कल्पना नसते. सोशल मीडियाचा वापर करताना साक्षरता नसल्याने फसगत होण्याचीच शक्यता अधिक असते.
व्हॉटसॲप या सोशल मीडियावरून व्हिडिओ कॉलिंग फिचरचा वापर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. समोरील व्यक्ती थेट दृश्य स्वरूपात दिसत संवाद साधला जात असल्याचे हे फिचर लोकप्रिय झाले आहे. परंतु, नेमक्या याचाच सायबर गुन्हेगार घेत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असे अडकवतात जाळ्यात...
सायबर भामटे नेमके सावज हेरून अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल करतात. समोरील भामटा न्यूड व्हिडिओ दाखवितात. भावना विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर समोरील व्यक्ती महिला असे तर ती अश्लील भाषेत बोलून अश्लील चाळे करण्यास भाग पाडते.
त्याचवेळी सायबर भामटे सारे रेकॉर्ड करीत असतात. कॉल संपल्यानंतर लगेच एक लिंक वा व्हिडिओ व्हॉटसॲपवर पाठवितात. त्यात कॉल रेकॉर्डिंग झालेले अश्लील दृश्य असतात. सायबर भामटे मेसेज वा चॅट करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जाते.
अनेकदा संशयित भामटा स्वतःला पोलिस अधिकारीही सांगतो. पैसे न दिल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची लिंकही शेअर केली जाते. एकदा पैसे दिल्यानंतर सदर प्रकार थांबेल असे वाटत असले तरी तसे होत नाही. पैशांची मागणी वाढतच जाते.
तरुणाई टार्गेट
सायबर भामट्यांकडून सावज म्हणून तरुणांना मोठ्याप्रमाणात टार्गेट केले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ते अशा तरुणांना हेरतात. सावज जाळ्यात अडकल्यानंतर सायबर भामटे तो व्हिडिओ इन्स्ट्राग्राम वा फेसबुक या सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देतात. बदनामीच्या भीतीने पीडित तरुण पैसे द्यायला तयार होता. वारंवार पैशांची मागणी झाल्यानंतर पीडित तरुण सायबर पोलिसांकडे धाव घेतात.
सावधगिरी बाळगा
* सोशल मीडियाचा वापर करीत असताना अनावश्यक परवानग्या देऊ नये.
*अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हिडिओ कॉल टाळावा.
*चुकून व्हिडिओ कॉलवरून संपर्क झालाच तर, संशयितांच्या धमक्यांना न घाबरता त्यासंदर्भात तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.
* ब्लॅकमेलिंगसाठी संशयितांनी ज्या क्रमांकावरून कॉल केला तो ब्लॉक करावा
* ब्लॉक केलेल्या कॉलसंदर्भात तत्काळ रिपोर्ट करावा
"व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करून संशयित ब्लॅकमेलिंग करतात. अशावेळी त्यांच्या धमक्यांना न जुमानता सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. तसेच सोशल मीडिया वापरताना जागरुकता महत्त्वाची आहे. सावधगिरीच्या सूचनांचे पालन केल्यास फसगत टाळता येऊ शकते." - डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे