
Nashik Crime News: रेशन धान्य वाहतूकप्रकरणी तिघांवर अखेर गुन्हा दाखल; 2 दिवसाची कोठडी
ओझर (जि. नाशिक) : ट्रकमधून ३ लाख ३८ हजार १६ रुपये किमतीचा २९० गोण्यांमध्ये भरलेला गहू नमुना तपासणीनंतर तो रेशनचा असल्याचे सिद्ध झाल्याने अवैध धान्य वाहतूकप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पार्वती अॅग्रो इंडस्ट्रीजचे विजय वाघ व वाहन चालक सोमनाथ भगवान अहिरराव या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून रामेश्वर ट्रेडिंग कंपनीचे विजय निंबा देवरे यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (case registered against three in case of illegal ration grain transportation 2 days custody Nashik Crime News)
गुरुवारी (ता. १६) रात्री ओझर पोलिस ठाणे हद्दीत एलसीबीचे पथक मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना तपासणीदरम्यान उमराणे (ता. देवळा) येथून ओझरकडे धान्याची वाहतूक करणारा ट्रक (क्र. एमएच ४६ एफ- ३२३९) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला होता.
चौकशी दरम्यान चालक सोमनाथ अहिरराव याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा संशय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आला होता. त्यांनी चालकासह मुद्देमाल ताब्यात घेतला.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरशीकर व निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या धान्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. चौकशीदरम्यान सदर रामेश्वर ट्रेडिंग कंपनीतून ओझरच्या पार्वती अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये नेला जात असल्याची कबुली चालक सोमनाथ अहिरराव याने दिली.
जीवनावश्यक वस्तूंची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी रामेश्वर ट्रेडिंग कंपनीचे विजय देवरे (रा. उमराणे ता. मालेगाव), ओझर येथील पार्वती अँग्रो इंडस्ट्रीचे विजय वाघ व चालक सोमनाथ अहिरराव (रा. माळीवाडा, सौंदाणे, ता. मालेगाव) या तिघांवर ओझर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करीत आहेत.