
CET Exam: सीईटी परीक्षांचा सुरू होणार धडाका! अभ्यासक्रम प्रवेशासाठी 10 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
CET Exam : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ला विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहे. पदवी, पदव्युत्तर पदवी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी करत शुल्क भरलेले आहे.
एप्रिल महिन्यापासून सीईटी परीक्षांचा धडाका सुरु होणार असून, पुढे मे-जूनपर्यंत या परीक्षा पार पडणार आहेत. (CET exams going to start with bang Registration of 10 lakh students for course admission nashik news)
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून सीईटी परीक्षांचे संयोजन केले जात असते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी सीईटी परीक्षांची प्रक्रिया रेंगाळल्याने थेट ऑगस्ट महिन्यात सीईटी परीक्षा पार पडल्या होत्या.
त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होताना डिसेंबर उजाडला होता. यावर्षी वेळीच शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या अनुषंगाने सीईटी सेल प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने सीईटी परीक्षांचे वेळापत्रक तयार केलेले आहे.
बहुतांश अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असून, आता परीक्षेच्या दिनांकाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे. एप्रिल महिन्यात सीईटी परीक्षांचा धडाका सुरु होणार असून, पुढे मे व जून महिन्यापर्यंत टप्याटप्याने वेळापत्रकानुसार या परीक्षा पार पडणार आहेत.
या सीईटी परीक्षांची नोंदणी सुरू
काही अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमासाठीच्या एमएचटी-सीईटी परीक्षेची पाचशे रुपये विलंब शुल्कासह मुदत १५ एप्रिलपर्यंत आहे.
आर्किटेक्चर शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (एम.आर्क.) च्या प्रवेशासाठी अर्जाची मुदत १४ एप्रिलपर्यंत आहे. उर्वरित सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
परीक्षानिहाय सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशी-
(१० एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार)
अभ्यासक्रम शुल्क भरून नोंदणी केलेले विद्यार्थी
एमएचटी-सीईटी (पीसीबी) २ लाख ९६ हजार ०९९
एमएचटी-सीईटी (पीसीएम) ३ लाख २३ हजार ५७४
एलएलबी (५ वर्षे) सीईटी २२ हजार ५२६
एलएलबी (३ वर्षे) सीईटी ७२ हजार ९२५
बी.एड. सीईटी ७९ हजार ९८४
बी.पी.एड. सीईटी ९ हजार ३९९
फाईन आर्ट सीईटी ३ हजार ४६०
बीए/बी.एस्सी. बीएड १ हजार ४११
बी.एचएमसीटी-सीईटी ९३६
बी. डिझाईन सीईटी ६३०