
Nashik Crime News : सोनसाखळी चोरट्यांना 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
Nashik Crime News : पाथर्डी फाटा येथे पादचारी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेणाऱ्या दोघा आरोपींना जिल्हा न्यायालयाते दोन वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदरील घटना मे २०१७ मध्ये घडली होती. (Chain snatcher thieves sentenced to 2 years hard labour Nashik Crime News)
योगेश दामु कडाळे (२०, रा. तानाजी चौक, सिडको), विशाल परसराम आवारे (१९, रा. बडदेचाळ, सिडको) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. मंगला रमाकांत शिरोडे (६५, रा. ता. साक्री, जि. धुळे. हल्ली रा. अमृता हिल्स, पाथर्डी फाटा) या ८ मे २०१७ रोजी पाथर्डी फाटा परिसरातून पायी जात होत्या.
हॉटेल चांगलं-चुंगलंजवळील खदान पुलाजवळ त्या असताना, दुचाकीवरून आलेल्या योगेश व विशालने त्यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाची ५४ हजार रुपयांची पोत बळजबरीने ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. व्ही. गिरमे यांनी तपास करून दोघांना पकडले व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. एम. वाघचौरे व श्रीमती सुनीता एस. चिताळकर यांनी कामकाज पाहिले.
त्यानुसार प्रथम वर्ग न्यायाधीश जी. एम. कोल्हापुरे यांनी दोघांनाही परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी व २ हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साधा कारावास दोघांना भोगावा लागेल. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार आर. के. पाटील यांनी पाठपुरावा केला.