NMC Election : मे महिन्यात NMC निवडणुकीची शक्यता; भाजप, शिंदे गटाकडून हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Election Latest Marathi News

NMC Election : मे महिन्यात NMC निवडणुकीची शक्यता; भाजप, शिंदे गटाकडून हालचाली

नाशिक : राजकीय निर्णयांच्या गुंतागुंतीमुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला राज्यातील सत्ता संघर्ष अंतिम टप्प्यात आला असताना त्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीची तयारी राजकीय पक्षाकडून सुरू झाली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या आमदारांना मे महिन्यात निवडणुका घेण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांना संघटना मजबुतीकरणासाठी मुंबईत तातडीने बोलविण्यात आले आहे.

सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षाकडून जलद गतीने होणाऱ्या या कारवाईमुळे मे महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Chance of NMC Election in May Movement by BJP Shinde group nashik news)

मागील वर्षाच्या मार्च महिन्यात राज्यातील १८ महापालिकांची मुदत संपुष्टात आली. त्यानंतर सर्वच महापालिकांवर प्रशासकीय राजवट लागू झाली. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण त्याचप्रमाणे प्रभागरचना आदी कारणांमुळे न्यायालयीन लढाई लढली गेली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवीन संघर्ष सुरू झाला. महाविकास आघाडीच्या सरकारने तीन सदस्यांचा प्रभाग निश्चित केला. प्रभागांची रचना करण्याबरोबरच त्यावर आरक्षणदेखील टाकले गेले. मात्र, सरकार पडल्यानंतर शिंदे व फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या तीन सदस्यांचा निर्णय रद्द करत चार सदस्यांचा प्रभाव तयार करण्याची घोषणा केली.

प्रभागरचना, आरक्षण व सत्ता संघर्षाचा वाद न्यायालयापर्यंत पोचला. आता १४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात निवडणुका संदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यापूर्वी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनदेखील हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

भाजपने विधिमंडळ अधिवेशनात आमदारांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून जिल्हाप्रमुखांची मुंबईत संघटनात्मक मजबुती करण्यासाठी तातडीने बैठक बोलविण्यात आली आहे.

पोटनिवडणूक ठरविणार भवितव्य

पुणे शहरातील कसबा व पिंपरी चिंचवड यातून पोटनिवडणुकीचा निकाल येत्या दोन दिवसाचा लागणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाल्यास तातडीने निवडणुका होऊ शकता, असे बोलले जात आहे.

तर अपयश आल्यास निवडणुका लांबण्याचीदेखील शक्यता आहे. मे महिन्यात निवडणुका घ्यायच्या झाल्यास विधिमंडळाचे अधिवेशन संपताच निवडणूक कार्यक्रम घेतला जाईल, असे बोलले जात आहे. मे महिन्यात निवडणुका न झाल्यास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील, असे बोलले जात आहे.