
Chhagan Bhujbal : रेशीम पार्क उभारण्यासाठी 25 एकर जागा : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : शहर हे पर्यटन दृष्ट्या व पैठणीसाठी अतिशय महत्त्वाचे शहर असून पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळण्याच्या दृष्टीने एरंडगाव येथे राखीव करण्यात आलेल्या जागेत रेशीम पार्क उभा करण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा अशा सूचना माजीमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Chhagan Bhujbal statement 25 acres of land for setting up silk park nashik news)
एरंडगाव येथे रेशीमपार्क उभारण्याबाबत शुक्रवारी (ता. २६) भुजबळ फार्म येथे बैठक पार पडली. प्रादेशिक रेशीम कार्यालय पुणेच्या सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे, नाशिकचे रेशीम विकास अधिकारी श्री. इंगळे, सारंग सोरटे, गटविकास अधिकारी अन्सार शेख, येवल्याचे निरीक्षक दिलीप खैरे, वसंत पवार, शिवाजी खापरे गोदावरी कन्सल्टंट सर्विसेसचे नितीन सोनवणे, राहुल महाजन, केतन काढवे, वैभव भावसार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
छगन भुजबळ म्हणाले, येवल्यातील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देवून रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपंचायत एरंडगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या २६ जानेवारी २०२० च्या ग्रामसभा ठरावानुसार गट नंबर २९३ मध्ये २५ एकर जागा रेशीम पार्ककरिता दिली आहे.
पैठणी तयार करण्यासाठी लागणारा रेशीमधागा परराज्यातून आयात करावा लागतो. या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे (रॉ सिल्क) उत्पादन स्थानिक पातळीवर व्हावे यासाठी येथे रेशीम पार्कची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
येथील पैठणी क्लस्टर कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला किमान १२५ मे.टन कच्चे रेशीम सूत लागणार आहे. त्यासाठी येवला समूह व जवळच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः २५०० एकर तुती लागवड असणे आवश्यक आहे.
लागवडीसाठी शासनाने बेणे, रोपे, अंडीपुंज, साहित्य व तुती उद्योगाचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. तुती रेशमची अंडीपुंजी बनविण्याकरिता ग्रेनेजची निर्मिती करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना तुती व टसर रेशीम लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात यावा अशा सूचना भुजबळांनी केल्या.
रेशीम पार्क कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व चिखलदरा व बारामती सारख्या रेशीम पार्कच्या धर्तीवर रेशीम पार्क उभारण्यात यावा. अशा सूचना भुजबळांनी अधिकाऱ्यांना केल्या.